तळोदा । प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील रांझणी येथील शेठ राणूलाल फुलचंद जैन कृषि तंत्र विद्यालय परिसरातील शेतशिवारात बिबट्याची दहशत कायम असून यामुळे शेतकरी व शेतमजूर तसेच ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे. मागील काही दिवसांपासून चिनोदा, रांझणी, रोझवा या भागात बिबट्याचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणावर दिसून येत असून चिनोदा, रांझणी शिवारात बिबट्याने वराह, श्वान, गायीचे वासरू, शेळ्या फस्त केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि.१६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास शेतकरी सुनिल जांभोरे हे जैन कृषि तंत्र विद्यालयाच्या मागे असलेल्या आपल्या शेतात जात असतांना त्यांना बिबट्याचे पायाचे ठसे दिसून आल्याने ते घाबरून लागलीच माघारी परत फिरून घरी परतलेत. त्यामुळे शेतकर्यांना शेतात जाणे, शेतीची कामे करणे सुध्दा जिकरीचे झाले आहे. सध्या शेतकऱ्यांकडून शेतीची कामे करण्यात येत असून त्यात पिकांना रासायनिक खते देणे, विविध औषधांची फवारणी करणे, मिरची तोडणी, केळी काढणी अशी शेतीची कामे करणे शेतकऱ्यांकडून करण्यात येत असल्याने त्यातच शेतशिवारात भर दिवसा बिबट्याचा मुक्त संचाराने शेतकरी, शेतमजूर तसेच ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भितीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासह पिंजरा लावण्याची मागणी करण्यात येत आहे.