नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील विखरण ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचपदी निर्मलाबाई रोहिदास मराठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
विखरण येथे सरपंच पदाची निवड सदस्यांमधून झाली असून कालावधी पाच वर्षाचा आहे. या ठिकाणी तीन टप्पे करण्यात आले होते. यामध्ये पहिल्या दोन वर्षासाठी छायाबाई बापू पाटील यांचा सरपंच पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या दोन वर्षासाठी निर्मलाबाई मराठे यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत कार्यालयात ही निवड प्रक्रिया घेण्यात आली.
यात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून खोंडामळी मंडळाधिकारी पानपाटील हे होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदाची निवड बिनविरोध झाली. या निवडी दरम्यान निर्मलाबाई रोहिदास मराठे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी उपसरपंच सुनिता चंदू पवार , ग्रामपंचायत सदस्य ईश्वर शिवाजी मराठे, सुमनबाई सुरेश मराठे, दिलीप नागो पाटील, छायाबाई बापू पाटील, भारतीबाई केशव पाटील, धर्मा पंडित भील, उखडी कृष्णा भील यांच्यासह ग्रामसेवक व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. सदरची निवड प्रक्रिया शांततेत पार पडली असून सरपंच निवड प्रक्रिया पार पाडल्यानंतर कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय आवारात जल्लोष करत आनंद साजरा केला.