नंदुरबार | प्रतिनिधी-
तलावीपाडा ता.नवापूर येथे शेतातील राहत्या घरात सर्याला दोर बांधून प्रेमीयुगलाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील शेगवे येथील १९ वर्षीय युवकाचे गावातील एका १६ वर्षीय नात्यातील मुलीशी प्रेमसंबध जुळले. परंतु दोघे एकमेकांचे नातेवाईक असल्याने आपले लग्न होऊ शकत नाही म्हणून दि.१२ सप्टेंबर २०२१ रोजी कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांना काही न सांगता निघून गेले होते. त्यानंतर दि.१६ सप्टेंबर २०२१ रोजी नैराश्यातून या प्रेमीयुगलाने नवापूर तालुक्यातील तलावीपाडा गावाच्या शेतात रखवालदारासाठी बांधण्यात आलेल्या घरात सर्याला दोर बांधून गळफास घेवून आत्महत्या केली. दि.१६ रोजी दुपारी शेजारील शेताच्या एक शेतकरी गवत कापत असताना त्याला घरातून दुर्गंधी येत असल्याने त्याने खिडकीतून पाहिले असता त्याला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यानंतर संध्याकाळी विसरवाडी पोलीस ठाण्यात माहिती दिली.
विसरवाडी गावात सातव्या दिवसाचा गणेश विसर्जन मिरवणूकीचा बंदोबस्त आटोपून विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलिस उपनिरीक्षक भुषण बैसाणे, पो.ना.अनिल राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. शेतातील घराचे दार उघडून पाहिले असता युवक व युवतीचे कुजलेले मृतदेह सर्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. दोघांनी तीन ते चार दिवसांपुर्वी आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी पोलीसांनी पंचनामा केला आहे. दोघांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.