नंदूरबार l प्रतिनिधी
थंडीच्या लाटेचा प्रलय नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये अधिक तीव्र असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ तसेच अक्कलकुवा तालुक्यातील दाब, वालंबा या परिसरात दवबिंदू गोठून बर्फाची चादर पसरल्याचे चित्र आहे.

हवामान तज्ञ सचिन फड यांच्या मते सातपुड्यातील तापमान ६ ते ७ अंश सेल्सिअस सतत असेल तर दवबिंदू गोठणे असे प्रकार घडतात, सातपुड्यातील पर्वतरांगांमध्ये सध्या थंडीमुळे दवबिंदू गोठले असले तरी प्रत्यक्ष तापमान किती अंशावर आहे हे सांगणे कठीण आहे. कारण या भागात हवामान विभागाच्या वतीने तापमान मापक यंत्रच बसवले नसल्याने नेमकं तापमान किती याचा अंदाज येत नाही. दवबिंदू गोठेपर्यंत थंडीची लाट आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

याचा परिणाम शेती पिकांवरही होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. थंडीपासून बचावासाठी नागरिक गरम कपडे तसेच शेकोटीचा आधार घेताना दिसून येत आहे. सातपुडा पर्वत रांगेतील या भागामध्ये हवामान मापक यंत्र बसवावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे, परंतु अद्यापही या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना केल्या गेलेल्या नाही.








