नंदुरबार | प्रतिनिधी –
येथील श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कूलमध्ये श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गणित प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला तसेच इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी गणित नाटिका, गणितवर आधारित नृत्य सादर करून विद्यार्थ्यांची गणिताविषयीची भिती दूर करण्याचा प्रयत्न केला.
२२ डिसेंबर हा प्रसिद्ध गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म दिवस गणित दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या गणित दिवसाचे औचित्य साधून येथील श्रीमती हिरीबेन गोविंददास श्रॉफ हायस्कूलमध्ये आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापिका सौ.सुषमा शहा, उपमुख्याध्यापक श्री.राजेश शहा, पर्यवेक्षक श्री.जगदीश पाटील, पर्यवेक्षिका सौ.विद्या सिसोदिया आदींनी श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्याध्यापिका सौ. सुषमा शहा यांनी विद्यार्थ्यांना जीवनात गणिताचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी गणित प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विशाखा अनिल सोनवणे, भुमी विनायक शिंदे, वैष्णवी दिपक जोशी, धृविका शरद बारी या विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थ्यांना गटानुसार विविध प्रश्न विचारून गणिताबाबत उद्बोधन करण्यात आले.यानंतर विद्यार्थ्यांची गणिताविषयीची भिती दूर व्हावी यासाठी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी गणित नाटिका सादर केली. याशिवाय गणितावर आधारित नृत्य व स्वरचित कविताही सादर करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेतील विद्यार्थिनी अनुष्का धनगर आणि वैष्णवी पवार यांनी केले. प्रास्ताविक कृष्णा पाटील याने केले. आभार प्रेम बागुल याने मानले.
कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी सर्व गणित शिक्षकांनी व शालेय परिवाराने परिश्रम घेतले.








