नंदुरबार l प्रतिनिधी
प्रेम, दया, शांतीचा संदेश देणाऱ्या ख्रिस्ती समाजाचे आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मोठे योगदान आहे. मिशनऱ्यांनी जे रोप लावले त्याचे वृक्षात रूपांतरही झाले. परंतु सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, व राजकीय प्रवाहामध्ये आजही ख्रिस्ती समाज नगण्य असल्याची खंत महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले यांनी व्यक्त केली. नंदुरबार येथील शासकीय विश्रामगृह मध्ये झालेल्या सर्व पंथीय ख्रिस्ती समाजाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास वळवी, लक्ष्मण पाडवी, सतीश वळवी सुरज गावित, सुमन गावित, जयंतीला गावित, बाळू आदी मान्यवर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
भोसले पुढे म्हणाले, ख्रिस्ती समाज राजकीय व सामाजिक प्रवाहामध्ये आत्तापर्यंत प्रामाणिकपणे उभा राहिला आहे. परंतु समाजाच्या भावनांचा आदर होताना अजूनही दिसून येत नाही. ग्रामपंचायतीपासून ते पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा येथे महाराष्ट्रातील मराठी ख्रिस्ती समाजाचे प्रतिनिधी शोधूनही सापडत नाही. तमाम ख्रिस्ती बांधवांना आता विचार करायला लावणारी वेळ आली असून, समाजाचे विविध प्रश्न मागण्या आजही प्रलंबित आहेत.
महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगामध्ये प्रतिनिधित्व, पंतप्रधानांच्या १५ कलमी अल्पसंख्यांक विकास कार्यक्रमांमध्ये जिल्हा पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत नेमणुका व्हाव्यात, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळावर प्रतिनिधित्व, महाराष्ट्रीय अनुसूचित ख्रिश्चनांना राजकारणात प्रतिनिधित्व दिले जात नाही. मूळ मागास प्रवर्गातील धर्मांतरितांना नोकऱ्या उच्च शिक्षणामध्ये आरक्षणाचा अभाव, ख्रिस्ती मिशन प्रॉपर्टी बोर्डची स्थापना व्हावी, ख्रिस्ती समाजावर दिवसेंदिवस होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटनाबाबत न्याय मिळत नाही, गाव पातळीवरील रेशनिंग कमिटी, तंटामुक्ती कमिटी, यामध्ये समाजाचा अंतर्भाव व्हावा.
तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने यापुढील काळात एकाच व्यासपीठावर येऊन लढा उभारल्याशिवाय न्याय मिळणार नाही. आता सुज्ञ तरुणांनी गांभीर्याने विचार करून योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे वरील मागण्या संदर्भात लवकरच महाराष्ट्रातील सर्व पंथीय ख्रिस्ती समाजाचे शिष्टमंडळ महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, यांची भेट घेऊन समाजाच्या ज्वलंत प्रश्नावर लक्ष वेधून आग्रही मागणी करणार आहे. येणाऱ्या काळात समाजाच्या न्याय हक्कासाठी मोठं जनआंदोलन उभे करण्यात येणार असल्याचेही भोसले यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीस राजू गावित, ईश्वर गावित, प्रफुल साने, प्रा. फिलिप गावित, संजय मावची, याेसेफ पाडवी, याकोप गावित, मनोहर गावित, सरपंच दिनकर, डॉ.निलेश वळवी आदींसह मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव उपस्थित होते. शेवटी विश्वास वळवी यांनी सर्वांच्या आभार मानले.