नंदुरबार| प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथे अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करून १५ वर्ष मुलीवर चुकीचा औषधोपचार करत तिचा मृत्यूस कारणीभूत झाल्याचा कारणावरून दोघा बनावट डॉक्टर पिता पुत्रा विरूध्द म्हसावद पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करून न्यायालयात दाखल केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथे गावातील डॉ.राजेंद्र उर्फ राजु श्रीपद पाटील व डॉ.विनोद राजेश (राजेंद्र) पाटील यांनी अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करून यांच्याकडे महाराष्ट्र वैद्यकीय परीक्षेचे नोंदणी/ परवाना नसतांना त्यांनी परवाना असल्याचे भासवून त्यांच्या राहत्या घरी मंगलाई नावाचे क्लिनीक चालवून अनधिकृतपणे व्यवसाय केला तसेच दि.२२ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास गावातील कु.चेतना दिगंबर पाटील (वय १५) रा.सुलतानपूर (ता.शहादा) हिच्यावर राहत्या घरात चालवत असलेल्या रूग्णालयामध्ये इंजेक्शन देवून चुकीचे औषधोपचार केला.
या औषधोपचारामुळे कु.चेतना पाटील हिचा मृत्यू झाला. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत तपासणी करून अहवालानुसार चेतना पाटील हिचा मरणाबाबत डॉ.राजेंद्र पाटील, विनोद पाटील यांच्या उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाल्याचा अहवाला आल्याने पोलीस उपनिरीक्षक सुनिल पद्माकर बिर्हाडे यांच्या फिर्यादीवरून म्हसवद पोलीस ठाण्यात डॉ.राजेंद्र उर्फ राजु श्रीपद पाटील व डॉ.विनोद राजेश (राजेंद्र) पाटील दोघे रा. सुलतानपूर (ता.शहादा) ह.मु.साई सेवाराम नगर (शहादा) यांच्या विरूध्द ३०४, ४१९, ४२०, २७६, ३४ सह महावैद्यकीय व्यवसायी अधी, १९६१ कलम ३३, ३३, (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार करीत आहेत.याप्रकरणी दोघांना अटक करून शहादा न्यायालयात हजर केले असता त्यां दोघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.