नवापूर l प्रतिनिधी
अवकाळी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसानाचे पंचनामे होऊन त्यांना भरपाई मिळवून ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने तहसिलदार मंदार कुलकर्णी यांना दिले आहे.
त्यांनी निवेदना मध्ये म्हटले आहे की, पावसाळा संपत आला असला तरी अचानक कधीही पावसाचे आगमन होते व तोंडावर आलेला घास हा निसर्गामुळे शेतकऱ्यांचा जात आहे. नवापूर तालुक्यात पावसाची अवकाळी अतिवृष्टी झाली व यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पाहिजे तसे पीक आले नाही, जे थोडेफार पीक आले होते जसे सोयाबीन, भात, कापुस इ. व त्यांची कापणी सुरु होती.
काही शेतकरी कापणी करणार होते तेवढ्यात पावसाचे आगमन झाले व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. दि. १७ व १८ ऑक्टोंबर २०२२ रोजी पावसाची अवकाळी अतिवृष्टी झाली व त्यामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले त्यामुळे शेतकरी हा हवालदिल झालेला आहे. सदर पिकाची लागवड व त्याचे संगोपनासाठी शेतकऱ्याने अतोनात प्रयत्न केले परंतु नैसर्गिक कारणास्तव त्यास या पिकाचे उत्पादन घेता आले नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे कधीही न भरुन येणारे असे आर्थिक नुकसान झालेले आहे.
शासनाने नुकसान ठिकाणाचे आपण पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी व झालेल्या अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.निवेदनावर माजी आमदार शरद गावीत, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अमृत लोहार,तालुका अध्यक्ष विनायक गावीत, तालुका सरचिटणीस मनोज वळवी,शहर अध्यक्ष शरद पाटील,शहर उपाध्यक्ष राकेश गावीत,नगरसेवक खलील खाटील,विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनिल वसावे,अ.संख्यांक तालुका अध्यक्ष ईद्रिस पठाण, तालुका युवक अध्यक्ष धिरसिंग वसावे,सदस्य संजय शिंदे,युवा जिल्हाउपाध्यक्ष ईलेश गावीत,दिलीप गावीत,रमेश गावीत,मलमजी गावीत,आकाश गावीत यांच्या सह्या आहेत.