नंदुरबार | प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या सप्टेंबरपासून अमृत आहार योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ‘घरपोच डबा’ देण्याचे आदेश बाल विकास प्रकल्प अधिकार्यांना देण्यात आले आहेत. परंतु या आदेशामुळे अंगणवाडी कर्मचार्यांमध्ये संतप्त भावना निर्माण झाल्या असून या नव्या योजनेला विरोध केला जात आहे. एवढेच नव्हे तर बेमुदत संप पुकारण्यात येणार असल्याचे राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रातून वाटप करण्यात येणार्या अब्दुल कलाम अमृत आहार योजनेत काहीअंशी बदल करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकार्यांना पत्र देण्यात आले आहे. या पत्रात प्रत्येक अंगणवाडी केंद्राच्या कार्यक्षेत्रातील पात्र लाभार्थी गरोदर व स्तनदा माता, दि.१ सप्टेंबरपासून महिला बचत गटामार्फत ताजा व गरम आहार शिजवून घरपोच डबा उपलब्ध करून द्यावा, असे नमुद केले आहे. शिवाय ७ महिने ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना आठवड्यातून ४ वेळा अंडी शिजवून द्यावी असेही सुचित केले आहे.
जिल्हा परिषदेचे पत्र प्राप्त होताच अंगणवाडी कर्मचार्यांमध्ये प्रशासन यंत्रणेविरुद्ध संतप्त भावना निर्माण झाली आहे. याबाबत कोरोनाच्या अतिसंवेदनशील परिस्थितीत बालमृत्यू रोखणे व कुपोषण मुक्तीसाठी अंगणवाडी कर्मचार्यांनी दिलेले योगदान व आम्हाला मिळणार्या मोबदल्याची तुलना प्रशासन स्तरावरुन व्हावी अशी अपेक्षा वजा सुचना अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे देण्यात येत आहे. कोरोना कालावधीत आहार शिजविण्याचा मोबदलाच मिळाला नाही, असे म्हणत अंगणवाडी सेविकांनी स्वतः खर्च करून दुध भुकटी खरेदी केली. अमृत आहार योजनेचा निधी नसतानाही आहार वाटपात नियमितता कशी ठेवली असावी? असा प्रश्नही संघटनेतर्फे उपस्थित केला जात आहे.
कर्मचार्यांच्या मागण्यांची फारशी दखल घेतली जात नाही, भ्रष्टाचाराची चौकशी होणे अपेक्षित असताना वेगळेच आदेश काढले जातात, ही बाब अंगणवाडी कर्मचार्यांसाठी अन्यायकारक आहे. असे म्हणत एक वर्षानंतर शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा नेमका उद्देश काय असाही सवाल उपस्थित होत आहे. शासनाच्या या अन्यायकारक भुमिकेला राज्यभरातून विरोध होत असून आंदोलन करण्यात येणार असल्याचे राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा माया परमेश्वर, कार्याध्यक्ष युवराज बैसाणे व अमोल बैसाणे यांनी सांगितले.
प्रशासनाला आदर्श सेवेचा विसर
कोरोना कालावधीत नर्मदा काठावरील चिमलखेडी ता. अक्कलकुवा येथील रेलू वसावे या अंगणवाडीसेविकेने स्वतः बोट चालवून नेत गरोदर, स्तनदा माता, किशोरवयीन मुली व बालकांच्या भल्यासाठी सेवा बजावली, त्यांचा नाशिक आयुक्तांकडून सत्कार करण्यात आला, शिवाय देशभर विविध स्तरावरुन गौरवही करण्यात आला. ही बाब नंदुरबार जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडी सेवेची साक्ष देत आहे. प्रशासनाकडून किमान अशा बाबींचा तरी विचार व्हावा, असे म्हणत प्रशासनाला कदाचित यांचा विसर पडला असावा असे म्हटले जात आहे.








