तळोदा | प्रतिनिधी
वारस दाखला तसेच जन्म मृत्यू नोंद महसूल विभागातील दंडाधिकारी यांच्या मार्फत देणे बाबतचे निवेदन शहादा-तळोदा विधान सभा मतदार संघाचे आ.राजेश पाडवी यांच्यातर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील जनजाती आदिवासी समाजातील बहुल वस्ती असलेले धडगांव, अक्कलकुवा, तळोदा, नवापूर आणि शहादा तालुक्यातील सामान्य जनतेस घरातील कुठलाही कुटुंबीय मयत झाल्यास त्यासाठी त्याला स्थावर मिळकती कामासाठी कोर्टातून वारस दाखला आणणे. महसूल विभागातील अधिकारी जबरदस्ती करीत आहेत. त्यामुळे सामान्य जनजाती आदिवासी जनतेस जी ७० टक्के जिल्ह्यातील वस्ती ही दारिद्रय रेषेखालील असल्याने जनतेस कोर्टाचा खर्च, वेळ व मिळकतीच्या नुसार स्टॅम्प ड्युटी भरावी लागत आहे. ती जाचक असल्याने कायद्यातील तरतुदीच्या अवलंब करून महसूल विभागातील तालुका दंडाधिकारी यांना वारस दाखला देण्याचे आदेश निर्गमित करावे. कोर्ट सुध्दा वारस दाखला देतांना महसूल विभागाचा आधार घेत आहे. त्यामुळे सामान्य जनतेस कोणत्याही प्रकारचा अधिकचा खर्च व वेळ वाचविण्यासाठी वारस दाखला हा संबधित तहसिलदार यांना देण्याचे निर्देश करावेत.
तसेच जन्म मृत्यू नोंदी या जनजाती समाज हा अशिक्षित व भोळा असल्याने त्यांच्याकडून कुठलीही नोंद राहून गेली असल्यास ती सुद्धा कोर्टातील प्रक्रियेनंतर करावी लागत आहे. त्यासाठी ही वेळ व पैसा खर्ची होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांना त्यांचा वेळ वाचावा, खर्च वाचावा यासाठी आपण जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना लिखित स्वरूपात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व तत्सम कायदे व त्यातील तरतूदींचा आधार घेत वारस दाखला व जन्म नोंद करून देण्याबाबतचे आदेश पारित करावे व जनतेचा वेळ व पैसा वाचवा. अन्यथा योग्य तो न्याय मिळवून घेण्यासाठी आंदोलन अथवा वरिष्ठ कोर्टात दाद मागणे भाग पडेल. अशा मागणीचे निवेदन शहादा-तळोदा विधान सभा मतदार संघाचे आ.राजेश पाडवी यांच्या तर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना देण्यात आले.