नंदुरबार l प्रतिनिधी
ग्राहक हिताच्या कार्याला प्रथम प्राधान्य देऊन ग्राहक जागृती, ग्राहक प्रबोधन, ग्राहक शिक्षण यावर भर देऊन ग्राहक हिताच्या कार्यात कार्यकर्त्यांनी स्वत:ला झोकून द्या, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य विकास महाजन यांनी केले. ते येथील ग्राहक कल्याण फाऊँडेशनच्या मासिक सभेत बोलत होते.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्य विकास महाजन (जळगाव) यांच्या अध्यक्षतेखाली येथील युवारंग फाऊंडेशनच्या कार्यालयात ग्राहक कल्याण फाऊँडेशन, नंदुरबारची मासिक बैठक घेण्यात आली. बैठकीत ग्राहक संरक्षण कायदा २०१९ चा प्रचार व प्रसार करणे, नंदुरबार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील नियुक्ती करणे, जिल्हा व प्रत्येक तालुका स्तरावर मोफत ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्र सुरु करणे, वैद्यकीय क्षेत्रासंबंधी जनजागृती करणे, विजेचे येणारे वाढीव बील दुरुस्ती करुन मिळणे, अवैध वाहतुक, वजनकाटे दरवर्षी प्रमाणित करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष जितेंद्र लुळे, शाम साळुंके, प्रसाद सोनार, जगन्नाथ राजपूत (तळोदा), मनोज जव्हेरी यांनी मनोगत व्यक्त केले. कोणत्याही ग्राहकाची फसवणुक झाली असल्यास फसवणुकीबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी तसेच तक्रार सोडविण्यासाठी निसंकोचपणे ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष जितेंद्र लुळे यांनी केले. ग्राहक कल्याण फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष तुकाराम महाराज निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश कार्यवाहक सतिष साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच अर्धवार्षिक बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी बैठकीत युवराज भामरे, देवेंद्र कासार, राहुल शिंदे, ऋषिकेश मंडलिक, शुभम पाटील, प्रणव पवार, संतोष महाजन, दिपक कुंभार, मिनाक्षी खैरनार, पुष्पलता ब्राम्हणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जितेंद्र लुळे तर आभार मनोज जव्हेरी यांनी मानले.