नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील कोरीट नाक्याजवळ पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दिल्याच्या कारणावरुन दोन गटात बेदम मारहाण झाल्याची घटना घडली. यात दोघांना दुखापत झाली असून नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात परस्पर फिर्यादीतून सुमारे ३० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील इंदिरा नगर येथील विनोद पप्पू पाडवी यांच्या अंगावर पाहुबा आखाडे याने दुचाकी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तसेच विनोद पाडवी यांना पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज का दिला या पाहुबा आखाडे याने स्टीलचा पाईप व काठीने मारहाण करीत दुखापत केली.
विश्वजित बैसावी (बॉबी) यानेही हॉकिस्टीकने डोक्यावर मारहाण केली. यावेळी साक्षीदार यांनी विनोद पाडवी यांना सोडवत असतांना आंबालाल ठाकरे, दीपक ठाकरे, लखन ठाकरे (भिल), नाग्या ठाकरे, सचिन ठाकरे, मुकेश ठाकरे, आशिष पिंप्रे व इतर आठ इसम यांनी जिवेठार मारण्याची धमकी दिली.
याबाबत विनोद पाडवी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात १५ जणांविरोधात भादंवि कलम ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर पाहुबा भिकन आखाडे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पाहुबा आखाडे दुचाकीने कोरीट नाक्याजवळून जात असतांना शाहरुख गावित याने दुचाकी अडविली. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार का केली असे बोलून वाद घातला. तसेच पाहुबा आखाडे यांना शाहरुख गावित, दिनेश भिल, मोहन माळी, दानवीर, रमन्या व इतर अनोळखी १० जणांनी हाताबुक्यांनी मारहाण केली.
याबाबत पाहुबा आखाडे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात १५ जणांविरोधात भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४९ सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.मंगलसिंग कोकणी करीत आहेत.