शहादा l प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सायबर गुन्हे संरक्षण या विषयावर विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी एक दिवशीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या चर्चासत्रास मुंबई येथील इंडिया टेक आयटी कंपनीचे संस्थापक डॉ. हरिश चंदर हे उपस्थित होते.डॉ. चंदर यांनी सायबर हल्ल्यापासून कसे संरक्षण करावे या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात संगणकाच्या वापर केला जातो.
ई-मेल, ऑनलाईन बँकिंगमध्ये होणारे सायबर हल्ले कशा पद्धतीने टाळता येतील याबद्दल त्यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रकाश पटेल हे होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. पंकज पेंढारकर यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
या उपक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रा.पंकज पेंढारकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.डाॅ.भरत चौधरी,प्रा. संदीप पाटील, प्रा. मुकेश कोळी,प्रा.प्रशांत चंदिले, प्रा. विजय सपकाळ आदींनी सहकार्य केले.