नंदूरबार l प्रतिनिधी
पोलीस खात्यात नोकरी करताना अनंत अडचणी येत असतात. अन्य कोणत्याही खात्यापेक्षा पोलीसांत सीक रिपोर्ट करण्याचे प्रमाण प्रचंड आहे. यात बरेचदा खोटा सीक रिपोर्ट करण्याचे प्रकारही होतात. याची अनेक कारणे आहेत.
मात्र पोलीस अंमलदार खरोखरच जेव्हा आजारी असतो किंवा अपघातात जखमी होतो तेव्हा दवाखान्याच्या खर्चामुळे तो बेजार होऊन जातो. पोलीस लाईनमधील एका रुमच्या घरातला संसार सांभाळणे कठीण होऊन जाते.
हे लक्षात घेऊन नंदुरबारचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी काल झालेल्या गुन्हे बैठकीत खरोखरच आजारी असलेल्या पोलीस अंमलदारांना एक महिन्याचे राशन पाठवण्याचे आदेश पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते.
त्यानुसार आज अर्धांगवायू, अपघात व अन्य कारणांमुळे आजारी असलेल्या पोलीस अंमलदारांना महिन्याचा किराणा त्यांच्या घरी पाठवला आहे.अंथरुणावर खिळून असलेल्या या सर्व पोलीस अंमलदारांना मात्र यामुळे सुखद धक्का बसला आहे.