नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार तालुका दुष्काळ जाहीर करावा, तसेच रोजगार हमी योजनेची कामे तात्काळ हाती घेवून शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार व शेतमजूर यांच्या हाताला काम उपलब्ध करुन द्यावे. तालुक्यातील मेंढपाळांसाठी नंदुरबार तालुक्यात असलेल्या जंगल जमीनीवर मेंढी व गुरेढोरे चराईसाठी मेंढपाळांना वन खात्याकडून तात्काळ परवानगी द्यावी, अशी मागणी नंदुरबार तालुका प्रहार शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन नंदुरबार येथील तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांना देण्यात आले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, नंदुरबार तालुक्यात यावर्षी २०२१ च्या पर्जन्यमान वीस टक्क्यांपेक्षा कमी झालेले असून शेतकर्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. जूनपासून तर आजपर्यंत ऑगस्ट पंधरवाड्यापर्यंत पावसाने नंदुरबार तालुक्यात पाठ फिरवली असून रोज आकाशात ढग दाटून येतात. परंतू पाहिजे तसा अपेक्षित पाऊस नंदुरबार तालुक्यात झालेला नाही. यामुळे नंदुरबार तालुक्यातील कोरडवाहू व बागायतदार शेतकरी धास्तावले असून रब्बीचे नगदी पिके घेणार्या शेतकर्यांच्य दोन वेळा पेरण्या झाल्या असून तरीही शासनाने शेतकर्यांना कुठलीही मदत दिलेली नाही. रब्बी पिके तिसर्यांदा पेरणी करुनही जगवण्यासाठी शेतकर्याना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आता तरी शासन व प्रशासन शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहील का? असा प्रश्न शेतकरी व शेतमजुरांच्या समोर आहे. पेरणी झालेली पिके करपू लागली आहेत.
जनावरांचा चाराचा प्रश्न गंभीर झाला असून नंदुरबार तालुक्यातील जनांवरांच्या चारासाठी कुठलीही ठोस उपाययोजना गेल्या चार वर्षापासून प्रशासनाने केलेली नाही. त्यामुळे यंदा तरी प्रशासनाने तात्काळ पाऊले उचलून शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्परता दाखवावी. व शासनास तात्काळ कळवून कृत्रिम पावसाचा प्रयोग लवकरात लवकर नंदुरबार तालुक्यासाठी करावा. किंवा प्रकाशा व सारंगखेडा येथे तापी नदीवर बांधण्यात आलेल्या बॅरेजेसचे पाणी गेल्या पंधरा वर्षापासून तसेच साठवून ठेवण्यात आले असून नंदुरबार तालुक्यातील ओस पडलेल्या धरणांमध्ये वरिल बॅरेजेसमधून शेती सिंचनासाठी तात्काळ पाणी साठा उपलब्ध करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रशासनाने कारवाई सुरु करावी. दुष्काळी परिस्थितीची भिषणता लक्षात घेवून रोजगार हमी योजनेची कामे तात्काळ हाती घेवून शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार व शेतमजूर यांच्या हाताला काम उपलब्ध करुन द्यावे. तसेच तालुक्यातील मेंढपाळांसाठी नंदुरबार तालुक्यात असलेल्या जंगल जमीनीवर मेंढी व गुरेढोरे चराईसाठी मेंढपाळांना वन खात्याकडून तात्काळ परवानगी द्यावी, ही नम्र विनंती.
वरिल विषयांवर लवकरात लवकर आठ दिवसाच्या आत प्रशासनाने तातडीचे पाऊले उचलणे गरजेचे असून त्वरीत कारवाई न झाल्यास शेतकर्यांच्या व शेतमजूरांच्या हितार्थ प्रहार शेतकरी संघटना नंदुरबार तालुका अंादोलन पवित्रा घेईल, याची आपण दखल घ्यावी, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देतेप्रसंगी प्रहार शेतकरी संघटनेचे योगेश नामदेव पाटील, अमोल किशोर पाटील, अंबर तेजू भिल, शामा दामा ठेलारी आदी उपस्थित होते.