नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथील बसस्थानकासमोर गेल्या ३५ वर्षापासून बेकायदेशीररित्या महावितरणाचा ताबा असलेल्या कार्यालयीन जागेवर न्यायालयाच्या आदेशाने कार्यालय खाली करण्याची नामुष्की ओढवली असुन सदर जागेच्या मालकाला ताबा मिळाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार शहरातील मुख्य रस्त्यावर बसस्थानक समोर व्यापारी मदनलाल जैन यांच्या मालकीची ४० हजार स्केअर फुट जागा १९३७ साली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी ५० वर्षाच्या कराराने भाडेतत्त्वावर दिली होती. ५० वर्षासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडून जागेचे मालक मदनलाल जैन यांना एका वर्षासाठी ३५१ रुपये भाडं असा करार करण्यात आला होता.
१९८७ साली सदर करार संपुष्टात आल्यानंतर जागेचे मालक मदनलाल जैन यांनी जागा खाली करून मिळावी अशी मागणी केली. महावितरण कंपनीच्या मुजोरी पणामुळे सदर जागा मालक मदनलाल जैन यांना परत न करता कार्यालयीन कामकाजासाठी वापरत राहिले.
दरम्यान २००० साली मदनलाल जैन यांनी जागेचा ताबा मिळावा यासाठी न्यायालयीन लढाई सुरू केली. २००६ साली दिवानी न्यायालयाचा निकाल मदनलाल जैन यांच्या बाजूने लागला. तरीदेखील महावितरण कंपनीने जागेचा ताबा दिला नाही. त्यानंतर सदर केस जिल्हा सत्र न्यायालयात दाखल असताना २०११ साली जिल्हा सत्र न्यायालयाने देखील मालक मदनलाल जैन यांना ताबा मिळावा असा निकाल लागल्यानंतरही
महावितरण विभागाकडून ताबा देण्यात आलेला नव्हता. त्यानंतर मालक मदनलाल यांनी मुंबई खंडपीठ औरंगाबाद न्यायालयात धाव घेतल्यानंतर १५ नोव्हेंबर २०२१ रोजी हायकोर्टाने मालक मदनलाल जैन यांना ताबा मिळावा असा निकाल दिल्यानंतर महावितरण कंपनीला गेली आठ महिने वारंवार खाली करण्यास विनंती करून देखील जागेचा ताबा देत नसल्याने
आज दि.१४ जून रोजी अखेर मदनलाल जैन यांनी वकिलांचा व कोर्ट कर्मचार्यांचा फौजफाटा घेऊन येत महावितरण कार्यालय खाली करण्यास भाग पाडले आहे.
अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयातून अखेर सामान काढून खाली करण्यास सुरुवात झाली आहे. महावितरण विभागाचा मुजोरी पणा आणि निष्काळजीपणाला अखेर खंडपीठाने दणका दिल्यानंतर कर्मचारी वठणीवर आले आहे.
गेली ३५ वर्ष महावितरण कंपनीने जागेचे मालक मदनलाल जैन यांना भाड दिलेला नाही. भारतीय संविधानावर आणि न्याय व्यवस्थेवर मला पूर्ण विश्वास असल्याने मी न्यायालयीन लढा लढून माझ्या मालकीच्या जागेचा हक्क मिळविला असल्याची प्रतिक्रिया व्यापारी मदनलाल जैन यांनी दिली आहे.
सदर महावितरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयातून नंदुरबार शहर व परिसरात वीज वितरणाचे काम चालत होते. त्यामुळे मोठ्या सामान अस्ताव्यस्त पडलेले आहे.
ऐरवी सामान्य नागरिक व कार्यालयांच्या वीज कनेक्शन कट करणार्या महावितरण कार्यालयावर आज व्यापारी मदनलाल जैन यांनी न्यायालयीन लढा देत वीज पाडली असल्याने शहरात एकच चर्चा आहे.
दुपारपासून कार्यकारी अभियंता संजय पाटील अतिरिक्त उपकार्यकारी अभियंत्या मनीषा कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्यांनी खाजगी वाहनांसह शासकीय वाहनांमध्ये सामान भरून नंदुरबार शहरातील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात घेऊन गेलेत.
सदर महावितरण कार्यालयाच्या बदलामुळे शहरी भागातील २८ हजार व ग्रामीण भागातील १५ हजार असे जवळपास पन्नास हजार ग्राहक वीज बिल भरणा व नवीन वीज कनेक्शन व तक्रारी यांची तारांबळ होणार आहे.
ग्राहकांसाठी काही सोय करण्यात येणार याबाबत विचारले असता वरिष्ठ नेत्यांनी बोलण्यातून स्पष्ट नकार दिला आहे.
दरम्यान विजवितरणच्या कार्यालयात वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या अनेक पत्रकारांना महावितरणच्या अधिकार्यांनी अरेरावेची भाषा वापरली. पत्रकारांवर अरेरावीची भाषा करणारे अधिकारी सामान्य नागरीकांशी कसे वागत असेल असा प्रश्न निर्माण होत आहे.