नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यात दोन दिवसात ४७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून पुढील आठवड्यात पावसाची शक्यता कमी, शेतकऱ्यांनी ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी असे आवाहन कृषि विज्ञान केंद्राने केली आहे.
भारतीय हवामान विभागाकडून दि १४ जुन रोजी संपूर्ण मध्य महाराष्ट्रासह नंदुरबार जिल्ह्यात देखील मॉन्सून दाखल झाला असे जाहीर केले. जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर, अक्राणी आणि अक्कलकुवा तालुक्यात मागील दोन दिवसांपासून बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून शेतकरी बांधवांनी लगेच पेरणीस घाई करू नये.
तसेच पेरणीयोग्य ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यास आणि पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पेरणी करावी. पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पेरणी केली तर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता कमी असते.
मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी आता पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपती घेतली असून बी-बियाणे खरेदीसह पेरणीची पूर्वतयारी केली आहे. मात्र अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही.
त्यामुळे शेतक-यांनी तूर्तास पेरणी करणे टाळावे. जिल्ह्यातील शेतक-यांनी हवामान अंदाज आणि कृषिसल्ला पाहण्यासाठी मोबाईल प्ले स्टोअर मधुन मेघदूत ॲप तसेच मॉन्सुन काळात पडणाऱ्या विजेपासून संरक्षणासाठी दामिनी ॲप डाऊनलोड करावे.
जिल्हा कृषि हवामान केंद्र, डॉ हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, कोळदा, ता. जि. नंदुरबार मार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त दर आठवड्यात मंगळवारी व शुक्रवारी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज आणि कृषिसल्ला याची माहिती What’s app ग्रुपच्या माध्यमातून देण्यात येते.
त्यासाठी तालुकानिहाय व गावनिहाय What’s app ग्रुप तयार करण्यात आले असून माहिती मिळवण्यासाठी ८९९९२२६५६३ What’s app नंबर वर नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपले नाव व तालुक्याचे नाव याचा मेसेज करावा.