नंदुरबार ! प्रतिनिधी
कार्ली , ता . नंदुरबार फाट्याजवळ चोरीचे मोबाईल व बॅटरी विक्री केल्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून २१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . दोघांना अटक करण्यात आली आहे . याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकृष्ण उर्फ समाधान मनोहर पाटील व दादाभाई बालू पाटील दोन्ही रा . कार्ली , ता.नंदुरबार अशी संशयितांची नावे आहेत . कार्ली फाट्याजवळ दोन जण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती . त्यानुसार पाळत ठेवली असता तेथे समाधान व दादाभाई हे संशयितरित्या उभे असल्याचे दिसून आले . त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन मोबाईल व एक बॅटरी आढळून आली . त्याबाबत चौकशी केली असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही . त्यामुळे दोन मोबाईल व बॅटरी चोरीची असल्याची शक्यता असल्याने दोघांविरुद्ध एलसीबीचे हवालदार महेंद्र नगराळे यांनी फिर्याद दिल्याने तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दोघांना अटक करण्यात आली आहे . तपास हवालदार सुनील अहिरे करीत आहेत .