नंदूरबार l प्रतिनिधी
सातपुड्यातील काठी येथील राजवाडी होळीला शतकोत्तर परंपरा आहे.गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भाविकांवर निर्बंध होते.यंदा मात्र हजारांच्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असल्याने महापंचायतची बैठक घेण्यात आली. या बैठकीत गुजरात मध्यप्रदेश महाराष्ट्र व काठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सातपुड्यातील होळी उत्सव 13 मार्च पासून सुरू होत असून 17 मार्च रोजी काठी येथील राजवाडी होळीचे आयोजन करण्यात आले आहे.

शतकोत्तर परंपरा असलेली सातपुड्यातील काठी येथील राजवाडी होळी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाहेरून येणाऱ्या भाविकांवर निर्बंध असल्याने साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली होती. आदिवासी सांस्कृतिक रुढी परंपरेने नटलेल्या काठी होळी उत्सवाला यंदा हजारांच्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असल्याने काठी संस्थांन व गावकऱ्यांच्या वतीने तयारी सुरू आहे. होळी उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे त्यासोबतच आदिवासी संस्कृती रूढी परंपरा देखील टिकली पाहिजे या उद्देशाने महापंचायत बैठक घेण्यात आली या बैठकीत गुजरात मध्यप्रदेश महाराष्ट्र व काठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये सातपुड्यातील काठी संस्थान ची होळी उत्सवाचे नियोजन व आदिवासी सण रूढी परंपरा यामध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या विकृतीकरणा वर प्रतिबंध लावणे, आदिवासी समाजात जन्मापासून लग्न ते मृत्यू पर्यंत असलेल्या विधी परंपरा टिकल्या पाहिजेत, संस्कृती नष्ट होऊ नये. आदिवासी गाव पाड्यातील मुला-मुलींमध्ये वय पूर्ण न होता पळून जाऊन लग्न करण्याच्या पद्धतीवर प्रतिबंध लावणे, शासनाने ठरवून दिलेल्या वयोमर्यादा नंतरच लग्न करावे जेणेकरून कुपोषणासारख्या आजारांना बळी पडणार नाही यासारखे सामाजिक विषयांवर देखील चर्चा करण्यात आली. तसेच होळी निमित्त पाळणी करून नाचगाण्यासाठी सोंग वेशभूषा परिधान करणारे मोरपीस मोरखी, बावाबुध्या, धानका टोको, होळी सेवेकरी मोरखी यांच्या वेशभूषेतील पारंपारिक सातत्य कायम राखावे. होळीनिमित्त येणारे भाविक व पर्यटकांनी नियम पाळावे अशा विविध विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा करून ठराव करण्यात आले. या महापंचायत बैठकीला मध्यप्रदेश गुजरात व महाराष्ट्रातील आदिवासी एकता परिषदेचे कार्यकर्ते, काठी स्टेट राजघराण्यांचे प्रमुख पृथ्वीराज सिंह, सी.के. पाडवी, नागेश पाडवी, झेलसिंग पावरा, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.
अशी असेल सातपुड्यातील होळी
डाब ( मोरी राही ) येथे 13 मार्च, मालपाडा , काकडपाटी , बदला , पानबारी , पाडली 14 मार्च, खुंटामळी , बर्डी 15 मार्च, कालीबेल , अस्तंबा , उर्मिलामाळ 16 मार्च, काठी ( राजवाडी होळी ) , गादवाणी , उमरागव्हाण 17 मार्च, मोलगी , तलाई 18 मार्च, जामली , असली 19 मार्च, जमाना 20 मार्च, तनाजे ( बुगवड ) 21 मार्च रोजी होळी असणार आहे.








