नंदुरबार ! प्रतिनिधी
समाजात वावरतांना सर्व भेद विसरून माणूस म्हणून जगायला शिकण्याची गरज असून त्यादृष्टीने अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांची मोलाची मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले.यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते 30 जोडप्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
जिल्हा परिषद सभागृहात आयोजित आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांना धनादेश वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, नवापूर पंचायत समिती सभापती रतीलाल कोकणी, अजित नाईक, रुपसिंग पाडवी, कुंदाबाई नाईक, दिलीप नाईक, जिल्हा परीषद समाज कल्याण अधिकारी देवीदास नांदगावकर आदी उपस्थित होते.
ॲड.पाडवी म्हणाले, आंतरजातीय विवाह करणाऱ्या युवक-युवतींनी समाजासमोर आदर्श प्रस्तूत केला आहे. शासनाने सर्वधर्मसमभावाचे तत्व स्विकारले आहे. राज्य घटनेला सर्वोच्चस्थानी मानून समाजात समानता आणि एकता स्थापन करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. भारतीय संस्कृतीत माणूसकीच्या तत्वाला सर्वाधिक महत्व आहे. आंतरजातीय विवाहात माणूस म्हणून एकमेकांचा सन्मान करण्याची भावना असल्याने अशा दाम्पत्यांचे सहजीवन इतरांना प्रेरणा देणारे आणि समाजात जातीय सलोखा निर्माण करणारे ठरेल, असे त्यांनी सांगितले.
आंतरजातीय विवाहासाठी कुटुंबियांचे सामंजस्याने मतपरिवर्तन करणे किंवा घरातून विरोध असतानाही लग्नानंतर आई-वडिलांचा सन्मान करून त्यांच्याकडे लक्ष देणे या दोन्ही गोष्टी कौतुकास्पद असल्याचे पालकमंत्री म्हणाले. त्यांनी विवाहीत दाम्पत्यांना सहजीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
श्रीमती वळवी म्हणाल्या, आंतरजातीय विवाहामुळे जातीय सलोखा निर्माण होण्यास मदत होईल. देशात एकात्मता स्थापन करण्यासाठी अशा विवाहांना प्रोत्साहन देणारी ही चांगली योजना आहे. माणूस म्हणून जोडीदाराला स्विकारणे महत्वाचे आहे.
श्री.गावडे म्हणाले, आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांनी मुलगा किंवा मुलगी असा भेद न मानता एक किंवा दोन अपत्यानंतर कुटुंब नियेाजन शस्त्रक्रीया करावी. मुलासारखेच मुलीलाही चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे. आंतरजातीय विवाहामुळे समाज सुदृढ होईल आणि जातीभेद नष्ट होण्यास मदत होईल.
प्रास्ताविकात श्री.नांदगावकर यांनी योजनेविषयी माहिती दिली. यावेळी आंतरजातीय विवाह केलेल्या तीन दाम्पत्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात मनोगत व्यक्त केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते 30 जोडप्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.