नंदुरबार | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदातर्फे मोलगी येथे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ऍड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मैनक घोष, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, सी.के.पाडवी, हरसिंग पाडवी, सिताराम पाडवी, ऍड. गोवाल पाडवी आदी उपस्थित होते.
ऍड. पाडवी म्हणाले, खावटी योजनेअंतर्गत राज्यातील १२ लाख कुटुंबाना लाभ देण्यात येणार आहे. खावटी अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर दोन हजार रुपये डीबीटीद्वारे वर्ग करण्यात येत असून दुसर्या टप्प्यात खावटी किटच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचा देण्यात येत आहेत. तांत्रिक कारणांमुळे योजनेचा लाभ न मिळालेल्या पात्र कुटुंबानादेखील लाभ देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्याची मोलगी पोषण व पुनर्वसन केंद्राला भेट
पालकमंत्री ऍड.पाडवी यांनी मोलगी ग्रामीण रुग्णालय व पोषण पुनर्वसन केंन्द्राला भेट दिली. कुपोषित बालकाचा आहार आणि उपचाराकडे योग्य लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधितांना दिले. तसेच बालकांच्या पालकाकडून उपचाराबाबत माहिती घेतली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके उपस्थित होते.