नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील बोहरी समाजाच्या इतिहासात प्रथमच बोहरी मस्जिदच्या प्रांगणात अंजुमन-ए-बुर्हानी,दाऊदी बोहरा समाजाच्या वतीने ध्वजारोहण व रक्तदान शिबिराचे आयोजन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नंदुरबार शहरातील बोहरी समाजाच्या वतीने धर्मगुरू सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली बोहरी गल्लीतील बोहरी मस्जिदच्या प्रांगणात नंदुरबार शहर पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. बोहरी समाज हा अत्यंत शांतताप्रिय समाज असून सर्व समाज बांधव हे वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून शहरात व्यावसायिक व सामाजिक संबंध जोपासत असतात. धर्मगुरू सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांनी दिलेल्या देशभक्तीच्या संदेशच्या प्रेरणेतून सदर ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी नंदुरबार शहर पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, बोहरी जमात सदस्य जनाब मुल्ला युसूफभाई नजमी, मुल्ला अदनानभाई सफदरी, कुतुबुद्दीनभाई फइस, मुर्तुझाभाई मर्चंड, शब्बीरभाई काटावाला, रोटेरियन फकरुद्दीनभाई जलगूनवाला यांच्यासमवेत बोहरी समाजाचे फिरदोसभाई लोखंडवाला, अलीअजगरभाई मर्चंट, ॲड. सलीमभाई वोरा, अब्बासभाई वोरा, गोपनीय शाखेचे अंमलदार शैलेंद्र माळी, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते. या ध्वजारोहण प्रसंगी बोहरी समाजाच्या वजीही स्काऊट पथकाने मेजर फकरुद्दीन जलगूनवाला यांच्या नेतृत्वाखाली संचलन करून तिरंग्यास मानवंदना दिली. यावेळी समाजाच्या लहान बालकांनी देखील देशभक्तीपर गीते गायली व तेथील वातावरण देशभक्तीमय केले. या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी रोटेरियन प्रितिष बांगड, नागसेन पेंढारकर, सय्यद इसरार अली व राजे शिवाजी माध्यमिक शाळेचे सयाजीराव सोनवणे यांनी सहकार्य केले. तसेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अंजुमन-ए-बुर्हानी, दाऊदी बोहरा समाजाच्या वतीने शासकीय रुग्णालय, नंदुरबार यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात एकूण 36 इच्छुक रक्तदात्यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान करून सदर शिबिर यशस्वी केले. या रक्तदान शिबिरात प्रसंगी बोहरा जमात सदस्यांसोबतच नगरसेवक चारुदत्त कळवणकर, नगरसेवक आकाश प्रवीण चौधरी, एम.आय.एम.चे रफत हुसेन आदी उपस्थित होते. सदर रक्तदान शिबिरासाठी श्री छत्रपती ब्लड फाउंडेशन चे अध्यक्ष जीवन माळी, रोटेरियन अनिल शर्मा, आकाश जैन, मनोज गायकवाड, सय्यद इसरार अली आदींनी सहकार्य केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी बोहरी जमात सदस्य, बोहरी समाज सदस्य, वजीही स्काऊट पथकाचे सर्व सदस्य आदींनी परिश्रम घेतले.








