तळोदा कोठार रस्त्यावर तळाचापड फाट्याकडे जाणार्या फरशी पुलावरून दुचाकी कोसळल्याने झालेल्या अपघात दुचाकीस्वार दिलिप किर्या पावरा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कात्री ता धडगाव येथिल दिलीप किर्या पावरा हा आपल्या पाळीव कोंबड्या तळोदा येथिल बाजारात विक्रीसाठी दुचाकीला बांधून आणत होते.धडगावहून येतांना कोठारच्यापुढे तळाचापडकडे जाणार्या फाट्यावर असणार्या फरशी पुलावरून जाताना दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने खाली कोसळली.भरधाव असणारी दुचाकी वळणावर नियंत्रित न झाल्याने दुचाकी पुलाखाली कोसळली असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
दरम्यान,दुचाकी आठ ते दहा फूट खोल कोसल्याने दिलीप पावरा यांना डोळ्याला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.अपघातानंतर तेथे उपस्थित असणार्या प्रत्यक्षदर्शी कार्यकर्त्यांनी १०८ रुग्णवाहीकेला संपर्क केला.त्यानंतर काही वेळातच रुग्णवाहिकेचे चालक कल्पेश पावरा व डॉ चेतन रावताळे हे घटनास्थळी दाखल झाले.त्याला त्यानंतर पुढील उपचारासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नंदुरबार येथिल जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.