नंदुरबार | प्रतिनिधी
जून महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यातील पाऊस झाल्यानंतर सोयाबिन पिकावर खोडमाशीच्या प्रादुर्भावास सुरूवात झाली असल्याने शेतकर्यांना सोयाबिन पीकावरील खोडमाशी व चक्रीभुंगा किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एकात्मिक किड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
जुलै महिन्याचा दुसर्या आठवड्यात सोयाबिन पेरणी केलेल्या पिकांवरदेखील पुढील काही दिवसात प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. खोडमाशीच्या प्रादुर्भावाने सोयाबिन उत्पादनात १६-३० टक्के घट होते. तर चक्रीभुगांच्या प्रादुर्भावामुळे देखील उत्पादनावर होतो. त्यामुळे शेतकर्यांनी सोयाबिन पीकावर खोंडमाशी व चक्रीभुंगाच्या व्यवस्थापनाकरिता शेतात पिवळे चिकट सापळे लावावे.
खोडमाशी व चक्रिभुंगा प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने व फांद्याचा किडीसह नायनाट करावा. खोडमाशी व चक्रीभुंग्याने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर (सरासरी १० टक्के किडग्रस्त) या दोन्ही किडीचे नियंत्रणासाठी इथेनॉल ५० टक्के- ३० मिली किंवा इंडोक्साकार्ब १५.८ टक्के-६-७ मिली किंवा क्लोरॅट्रॅनिप्रोल १८.५ टक्के ३ मिली किंवा थायोमेथोक्झाम १२.६ टक्के अधिक लँब्डा सायहॅलोथ्रिन ९.५ टक्के झेडसी २.५० मिली यापैकी कोणतेही एका किटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नंदुरबार यांनी कळविले आहे.