तळोदा । प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील चिनोदा येथे लुपिन ह्युमन वेलफेअर अॅण्ड रिसर्च फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला लुपिन ह्युमन वेलफेअर अॅण्ड रिसर्च फाउंडेशनचे सहाय्यक कार्यक्रम व्यवस्थापक लक्ष्मण खोसे, सहाय्यक कार्यक्रम व्यवस्थापक सुनिल सैंदाणे, प्रकल्प समन्वयक दिपक जाधव, पि.यू.व्यवस्थापक किरण पाटील, तालुका समन्वयक अभंग जाधव, रांझणी कृषि विद्यालयाचे कर्मचारी दिपक मराठे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषिमित्र करमसिंग पावरा यांनी केले.
यावेळी रांझणी कृषि विद्यालयाचे दिपक मराठे यांनी राष्ट्रीय शेतकरी दिवस याविषयी बोलतांना सांगितले की, देशाचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग हे स्वतः शेतकरी कुटुंबातील होते. शेतकऱ्यांचे नेते मानले जाणारे चौधरी चरण सिंग यांचा जन्म २३ डिसेंबर १९०२ रोजी झाला. २३ डिसेंबरला त्यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी दिन साजरा केला जातो. ते स्वत: शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना शेतकर्यांच्या समस्या आणि परिस्थितीची चांगली जाण होती. त्यामुळे त्यांनी शेतकर्यांसाठी भरीव कामगिरी केली. तसेच त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. चौधरी चरणसिंग हे फार कमी काळ पंतप्रधान असतानाही त्यांनी भारतीय शेतकऱ्यांसाठी कठोर परिश्रम घेतले. त्यांच्या या योगदानाबद्दल सन २००१ मध्ये सरकारने चौधरी चरणसिंग यांचा वाढदिवस शेतकरी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. म्हणून राष्ट्रीय शेतकरी दिन हा २३ डिसेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो असे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच लुपिन फाऊंडेशनचे पि.यू.व्यवस्थापक किरण पाटील यांनी लुपिन फाऊंडेशन मार्फत शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध शेतीविषयक योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तर चिनोदा येथील शेतकरी सुनिल पवार यांनी देखील शेतकरी दिनाबाबत आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी लुपिन फाऊंडेशनचे कृषिमित्र करमसिंग पावरा, दिपक ब्राह्मणे, प्रतापसिंग वसावे, दिपाजंली पावरा आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला चिनोदा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन दिपाजंली पावरा यांनी मानले.








