नंदुरबार l प्रतिनिधी
अवघ्या देशातील आदिवासी संस्कृतीचे संवर्धन करणे, जीवनमूल्यांची ओळख करून देणे व खऱ्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी राजस्थान (प्रतापगड) येथे होणाऱ्या एकता परिषदेच्या २९ व्या सांस्कृतिक महासंमेलनात समाजबांधवांनी आदिवासींच्या पारंपरिक पेहराव परिधान करणे बंधनकारक आहे, असा निर्णय नंदुरबार येथे झालेल्या राज्यस्तरीय सभेत घेण्यात आला. महासंमेलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची संयुक्त सभा नंदुरबारात घेण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी रॉबिन नाईक होते, तर ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे, एकता परिषदेचे संस्थापक सदस्य दरबारसिंग पाडवी, राज्य महासचिव डोंगरभाऊ बागुल, जि. प. सदस्य सी. के. पाडवी, सीताराम राऊत, करमसिंग पाडवी, ॲड. अभिजित वसावे, भीमसिंग वळवी, सुनील गायकवाड, प्रेमचंद सोनवणे, ॲड. शितल गायकवाड, ॲड.जयकुमार पवार, ॲड. विजय नाईक, सुभाष नाईक, चंद्रसिंग बर्डे, ॲड.आपसिंग वळवी, जयसिंग वळवी, सरपंच सत्तरसिंग शेमले, सतीलाल शेमले, जमन ठाकरे, दीपक अहिरे, प्रमोद ठाकरे, दीपक ठाकरे, भगवान वाळवी, कृष्णा गावित, जया सोनवणे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
या सभेत महासंमेलनासाठी महाराष्ट्रातुन वक्ते, युवा व महिला सत्राच्या अध्यक्ष पदासाठी नावे घेण्यात आली. रॅली व आर्थिक नियोजन यावर चर्चा करण्यात आली. यासह आदिवासींच्या विविध समस्यांवरही चर्चा करण्यात आली. शिवाय महासंमेलनात प्रत्येक वक्त्यांनी नेमक्या मुद्यावर मत मांडावे, भरकटल्यास मर्यादा आणल्या जातील असाही निर्णय यावेळी घेण्यात आला. प्रेमचंद सोनवणे यांनी आदिवासी संस्कृती व जीवन पद्धतीत अवघे विश्व वाचविण्याची ताकद असल्याचे म्हणत हि संस्कृती वाचविण्याचे आवाहन केले. सुनील गायकवाड यांनी प्रस्थापित संस्कृतीचा अवलंब होत असल्याची खंत व्यक्त केली. जया सोनवणे यांनी आदिवासी महिलांच्या समस्या मांडल्या.
विस्थापनाचे कडवट वास्तव:-
रॉबिन नाईक यांनी आदिवासी विस्थापनाचा मुद्दा उपस्थित करीत उकाई धरणामुळे विस्थापित झालेले आदिवासी त्याच धरणामुळे विकास झालेल्या ठिकाणी कमला जात असल्याचे भयावह तथा कडवट वास्तव मांडले. शिवाय विकासासाठी आदिवासी भाग प्रस्थापितांच्या नजरेत असल्याचे म्हणत बांधवांनी दक्ष राहण्याचे आवाहन केले.
आदर्श संहितेला पळवाटा:-
आदिवासींच्या प्रत्येक बाबी मौखिकच राहिल्या, लिखीत बाबींअभावी आदिवासी भागात सर्वाधिक घुसखोरी झाली. याच घुसखोरीमुळे अन्यायी प्रवृत्तीने देखील आपले पाळेमुळे चांगलीच रोवली. परिणामी आदिवासींची आदर्श आचारसंहितेला देखील धोका निर्माण झाल्याचे म्हणत भगवान वळवी यांनी विविध पक्ष व धर्मांमध्ये विभागणाऱ्या समाज बांधवांबाबत खंत व्यक्त केली.








