नंदुरबार l प्रतिनिधी-
जिल्हा नियोजन समिती व आदिवासी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘प्रकाश वाटा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत 100 आदिवासी विद्यार्थी व 100 विद्यार्थिनींना NEET व JEE परीक्षांसाठी संपूर्ण वर्षभर मोफत निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा नंदुरबार, शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोठली आणि पीएमश्री शासकीय आश्रम शाळा ढोंगसगळी येथे अत्याधुनिक अभ्यास केंद्रे निश्चित करण्यात आली असून, आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी या अभ्यास केंद्रांना भेट देऊन निवास व्यवस्था, शैक्षणिक सुविधा, अभ्यासाचे वातावरण व विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या सर्व तयारीचा सविस्तर आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत डॉ. चंद्रकांत पवार हे सातत्याने उपस्थित राहून संपूर्ण उपक्रमाची माहिती दिली. आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार प्रशिक्षण मिळावे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्यांना मोठ्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांनी घेतलेल्या पुढाकाराचे यावेळी विशेष कौतुक झाले.
कोठली येथील आश्रम शाळेत विद्यार्थिनींच्या पारंपरिक लेझीम पथकाने जिल्हाधिकारी डॉ मिताली शेठी यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले. त्यानंतर घडलेला प्रसंग सर्वांसाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी ठरला. जिल्हाधिकारी डॉ मिताली शेठी विद्यार्थिनींसोबत कोणताही औपचारिकपणा न ठेवता स्वतः त्यांच्या शेजारी बसल्या, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि आदिवासी विद्यार्थिनींच्या मनातील भावना, स्वप्ने, अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या. “शाळा आवडते का?”, “अभ्यासात काही अडचण आहे का?”, “भविष्यात काय बनायचे आहे?” अशा आत्मीयतेने विचारलेल्या प्रश्नांमुळे विद्यार्थिनींचा संकोच दूर झाला आणि त्यांनीही मनमोकळेपणाने संवाद साधला.
जिल्हाधिकारी डॉ मिताली शेठी यांचा हा जिव्हाळ्याचा, आपुलकीचा आणि संवेदनशील संवाद पाहून आश्रम शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी अक्षरशः भारावून गेले. प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी स्वतः आपल्यामध्ये बसून आपल्या भावना जाणून घेत आहेत, ही बाब विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरली. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, आत्मविश्वास आणि उत्साह हा या भेटीचा सर्वात मोठा ठेवा ठरला.
यावेळी दहावीच्या विद्यार्थिनींनी “या झोपडीत माझ्या” या प्रेरणादायी कवितेचे सामूहिक गायन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थिनींच्या कलागुणांचे जिल्हाधिकारी डॉ मिताली शेठी यांनी मनापासून कौतुक करत त्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि मेहनतीच्या बळावर ती पूर्ण करण्याचा संदेश दिला.
भेटीदरम्यान ‘हरित नंदुरबार’ उपक्रमांतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा नंदुरबार व शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोठली येथे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमालाही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी परिविक्षाधीन आय ए एस अधिकारी अधिकारी डॉ. पंकज पटले, शिक्षण विस्तार अधिकारी निर्मल माळी, ट्रु टीचर्स संस्थेचे संस्थापक अरविंद सिंग तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘प्रकाश वाटा’ हा उपक्रम केवळ NEET-JEE चे प्रशिक्षण देणारा नसून, आदिवासी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी वाट खुली करणारा उपक्रम म्हणून नंदुरबार जिल्ह्यात विशेष आशेने पाहिला जात आहे.








