नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शेतकरी संघाच्या वतीने आज शासकीय आधारभूत किंमत योजना खरीप हंगाम २०२१/२२ अंतर्गत भरड धान्य खरेदी केंद्राचे उद्घघाटन नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले .
यावेळी मालदांडी ज्वारी २७५८ ,संकरीत ज्वारी २७३८ ,बाजरी २२५० , मका १८७० रुपये या भावाने मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने शेतकरी संघ खरेदी करत आहे . शेतकरी सहकारी संघ नंदुरबारच्या वतीने शेतकर्यांना सूचना करण्यात आल्या आहेत की शेतकर्यांनी आपले भरड धान्य सुकवून आणि चाळणी करून खरेदी केंद्रावर आणावे. धान्यातील ओलाव्याचे प्रमाण जास्तीत जास्त १४ टक्के पेक्षा कमी असावे.जास्त ओलावा असलेले धान्य खरेदी केले जाणार नाही यांची नोंद शेतकर्यांनी घ्यावी .
सर्व शेतकर्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी , नोंदणीची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२१ आहे. ज्या शेतकर्यांची नोंदणी झालेली आहे त्याच शेतकर्यांचे भरड धान्य खरेदी करण्यात येणार आहे.नोंदणी करतांना सदर धान्याचा पेहराची ऑनलाईन नोंद असलेला ७/१२ उतारा ,आधार कार्ड व बँक पासबुक आणावे. असे आवाहन शेतकरी संघाचे अध्यक्ष बी.के.पाटील यांनी केले आहे .उद्घघाटन प्रसंगी मार्केट कमिटीचे सभापती हिरालाल पटेल, शेतकरी संघाचे संचालक किशोर पाटील ,संचालक पुंजाभाई पाटील , संचालक अरुण हजारी , प्रा .आर.बी .पाटील , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर,शेतकरी संघाचे मॅनेजर आनंदा पाटील कृष्णा पाटील हे उपस्थित होते.








