नंदुरबार l प्रतिनिधी
सीमेवर देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. अशा सैनिकांच्या सन्मानासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीत प्रत्येकाने उदारतेने योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, पोलिस उपअधीक्षक विश्वास वळवी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड, सुभेदार मेजर रामदास पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, देशसेवेसाठी सीमेवर जवान नेहमी सज्ज असतात. भारतीय सेनेवर प्रेम असणारे आणि समाजाप्रती आपले काही देणे आहे या भावनेतून अशा जवानांच्या सन्मानासाठी ध्वजदिन निधीचे संकलन करण्यात येते. त्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक,अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ध्वजदिन संकलनासाठी प्रयत्न करावेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गावडे म्हणाले, देशाच्या सीमेवर लढणारे व वेळप्रसंगी प्राणांची आहुती देणारे सैनिक हे खऱ्या अर्थाने आपले प्रेरणास्थान आहेत. त्यांच्यासाठी ध्वजदिन निधी संकलनाचा उपक्रम घेण्यात येत असून ध्वजदिन निधी संकलनात जिल्ह्यातील सर्व विभागांनी अतिशय चांगले कामे केले आहे. केलेल्या कामाबद्दल सर्व विभागांची अभिनंदन करतो व यापुढील उद्दिष्टही पूर्ण करावे असे आवाहन श्री. गावडे यांनी यावेळी केले.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. गायकवाड यांनी सांगितले की जिल्ह्याला गेल्या वर्षी 36 लाख 30 हजार रुपये निधी संकलनाचे उद्दीष्ट होते ते पुर्ण केले. तसेच यावर्षी रुपये 36 लाख 30 हजार इतके उद्दिष्ट असून मागील वर्षी दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे 100.99 टक्के उद्दिष्ट पूर्ण करुन जिल्हा अग्रेसर आहे. नंदुरबार जिल्हा गेल्या तीन वर्षापासून उद्दिष्ट पूर्ण करत असून पुढील वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण करेल असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी दिप प्रज्वलन करुन शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहीद राजाराम खोत आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थिंनीनी देशभक्तीपर व स्वागतगीत सादर केले. यावेळी वीर पत्नी माधुरी पाटील व छाया खोत यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी इंद्रसिंग राजपूत यांनी आजी- माजी सैनिकांचे प्रशासकीय काम उत्कृष्ट केल्याबाबत त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच ध्वजदिन निधी संकलनाचे उत्कृष्ट कार्य केलेल्या विविध शासकीय विभागातील, शैक्षणिक संस्थेतील अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपशिक्षक किरण दाभाडे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ लिपिक सयाजी बेरड, लिपिक नि टंकलेखक जितेंद्र सरोदे, प्रशांत लिंगायत, संजू पगारे यांनी परिश्रम घेतले.









