नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, भादवड येथील मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडत मोठी कारवाई केली. प्रसूती रजा, बालसंगोपन रजा आणि मे महिन्याचे वेतन बिल काढून देण्यासाठी २ हजार ३५० रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापक विलास मधुकर पाटील (वय ४९) यांना एसीबीच्या पथकाने जेरबंद केले.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, भादवड येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत कार्यरत असलेल्या ३० वर्षीय महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रसूती रजा, बालसंगोपन रजा आणि मे महिन्याच्या वेतनाचे बिल मंजूर करून देण्यासाठी मुख्याध्यापक विलास पाटील यांनी २ हजार ३५० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
तक्रारीची २४ जुलै २०२६ रोजी पडताळणी करण्यात आली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर २७ जुलै २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक विलास पाटील यांनी तक्रारदाराकडून २ हजार ३५० रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.
एसीबीचे नागरिकांना आवाहन
कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागाने केले आहे.








