नंदुरबार | प्रतिनिधी –

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ करुन सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहेत. या इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांच्या जनजीवनावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे येत्या १२ डिसेंबर रोजी दिल्ली येथे सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली मेहंगाई हटाव रॅली काढण्यात येणार असून त्याद्वारे सरकारला जाब विचारण्यात येईल, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भा.ई. नगराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देशभरात दि.१४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान कॉंग्रेसतर्फे जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त आज नंदुरबारात कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्ह्याचे निरीक्षक भा.ई.नगराळे यांनी भेट दिली.
त्यावेळी पत्रकार परिषदेत श्री नगराळे म्हणाले, देशभरात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या किमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. सन २००४ पूर्वी कच्च्या तेलाची किंमत १०९ डॉलर प्रति बॅरल भाव होता. त्यावेळी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत ६५ ते ७५ दरम्यान होत्या. आता ५४ डॉलर प्रती बॅरल भाव असताना पेट्रोल एकशे दहा रुपयांवर तर गॅस हजार रुपयांपर्यंत पोहचला आहे. या प्रचंड भाववाढीचे परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होत आहे.
देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाले आहे. मोदी सरकारने २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे गेल्या सात वर्षात १४ कोटी बेरोजगारांना रोजगार मिळणे अपेक्षित होते.
परंतु रोजगार तर मिळाला नाही परंतु अनेकांचे रोजगार गेले. स्विस बँकेत असलेला भारतीयांचा काळा पैसा भारतात आणून प्रत्येक नागरिकाला पंधरा लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते.
परंतु एक रुपया देखील कोणाला मिळाला नाही किंवा काळा पैसादेखील भारतात आला नाही. गेल्या पाच वर्षात तब्बल ७० वेळा भाववाढ झाली.
त्यामुळे येत्या १२ डिसेंबर रोजी दिल्ली येथे सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली मेहंगाई हटाव रॅली काढण्यात येणार असून त्याद्वारे सरकारला जाब विचारण्यात येईले, असेही ते म्हणाले. यावेळी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.









