नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील नागसर येथे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तोडल्याच्या कारणावरुन दोन गटात वाद झाल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याने यात चौघांना दुखापत झाली असून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात परस्पर फिर्यादीतून १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील नागसर येथील महेश्वर महादू गावित यांच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अशोक शेगा गावित यांनी तोडून टाकल्याच्या संशयावरुन वाद निर्माण झाला. यात अशोक गावित, सुबीबाई शेगा गावित, अशोक गावित यांच्या दोन मुली, कल्पेश, व चंदू गावित यांनी महेश्वर गावित, मोतीराम महादू गावित यांना हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच विपुल मोतीराम गावित यास लोखंडी गजाने मारुन दुखापत केली. याबाबत महेश्वर गावित यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.विनायक सोनवणे करीत आहेत. तसेचदुसऱ्या घटनेत सुबीबाई शेगा गावित यांनी परस्पर दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुबीबाई गावित यांनी वडीलोपार्जित बांधकाम सुरु असलेली जागा देण्यास नकार दिला. या कारणावरुन महेश्वर महादू गावित याने अशोक गावित यांना लोखंडी सळईने मारुन दुखापत केली. तसेच सरस्वती महेश्वर गावित यांनी सुबीबाई गावित लोखंडी सळई व काठीने मारहाण केली. तर सागर महेश्वर गावित, दिशा महेश्वर गावित, मोतीराम महादू गावित, विपुल मोतीराम गावित, दीपक जालमसिंग गावित यांनी हाताबुक्यांनी मारहाण करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत सुबीबाई गावित यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.वसावे करीत आहेत.








