नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाचे ( एसटी ) राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे . न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने समिती नेमण्याबाबत काढूनही एसटी अधिसूचना संघटनांनी संप मागे घेतला नाही . अखेर एसटी महामंडळाच्या विभागीय पातळीवरून गुरुवारी कारवाईचा बडगा उगारत आज दि. १० नोव्हेंबर रोजी नंदुरबार जिल्ह्यातील ४ आगारांतील २३ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे .
निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नंदुरबार बस आगारातील ५ तर शहादा आगारातील ६, नवापूर आगारातील ५ तर अक्कलकुवा आगारातील ७ जणांचा समावेश आहे . राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते . ग्रामीण भागातील विशेषतः गाव – खेड्यातील प्रवासीवर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे . एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या आणि अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनामुळे एसटीच्या जिल्ह्यातील ४ आगारांमधील वाहतूक यामुळे पूर्णपणे ठप्प झाली आहे . एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही , तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही , अशी ठाम भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे .








