नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील समशेरपुर येथील आयान मल्टीट्रेड साखर कारखान्याच्या गाळप हंगामाला आज प्रारंभ करण्यात आला याच वेळी सहवीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला. कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.सी बडगुजर अध्यक्षस्थानी होते.
कारखान्याच्या गाळप हंगामाला आज प्रारंभ झाला. परिसरातील शेतकऱ्यांच्या हस्ते संगणकीकृत अत्याधुनिक स्वयंचलित ऊस वजन काट्याची आणि गव्हाणी चे पूजन करण्यात आले गव्हाणीत मोळी टाकून गाळपास प्रारंभ झाला. कारखान्याचे संचालक सचिन सिनगारे, अतुल क्षीरसागर, ऊस उत्पादक, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी श्री. बडगुजर यांनी सांगितले, कारखाना यावर्षी सुमारे बारा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याची गाळप क्षमता वाढली आहे. परिसरातील संपूर्ण उसाचे गाळप होईल. अन्य कारखान्यापेक्षा अधिकचा दर यापूर्वी दिला आहे. एफआरपीपेक्षा शंभर रुपये प्रति मेट्रिक टन जास्त दर दिला आहे. यावर्षी देखील कारखान्याकडून अधिकचा दर दिला जाईल. ऊस उत्पादकांनी आपला ऊस कारखान्याला द्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. डिझेलच्या किमती वाढल्या आहेत त्यामुळे वाहतूक दर देखील वाढवण्यात येईल.
बोनस ची घोषणा
कारखान्याच्या कामगारांना दिवाळी बोनस पोटी ८.३३ टक्के रक्कम दोन दिवसात कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे यावेळी घोषित करण्यात आले.
सहवीजनिर्मिती प्रकल्प
कारखान्याचा सहवीज निर्मिती प्रकल्प देखील आज सुरू करण्यात आला तसेच अधिकचा एफआरपी दिल्यामुळे साखर आयुक्तांनी नामांकन यादी घोषित केली त्यात आयान कारखान्याला ग्रीन झोन मधील सर्वोच्च नामांकन जाहीर झाले ही बाब समाधानाची असल्याचे यावेळी सांगण्यात आले.








