नंदुरबार l प्रतिनिधी-
प्रामाणिकता आणि निष्ठा हे आदिवासी समाजाचे पूर्वापार वैशिष्ट्य राहिले आहे. वीर भगवान एकलव्य यांच्या जीवनपटातून प्रामाणिकता आणि निष्ठा याचीच प्रामुख्याने शिकवण मिळते. आपणही आपले अधिकार आणि अस्मिता जपण्यात बरोबर तीच प्रामाणिकता अंगीकारली पाहिजे, असे विचार माजी खासदार संसदरत्न डॉ. हिना गावित यांनी व्यक्त केले. भगवान एकलव्य यांचा साक्री तालुक्यात प्रथमच मोठ्या आकाराचा पुतळा स्थापन होत असून आपल्याला सर्वांना त्यांचे विचार प्रेरणा देत राहतील; असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
साक्री तालुक्यातील देवजीपाडा या गावात माजी खासदार संसदरत्न डॉ. हिना गावित यांनी दिलेल्या निधीतून भगवान एकलव्य यांचा मोठ्या आकाराचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे. त्याचे अनावरण डॉ. हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या. भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित, साक्री येथील माजी सभापती कविता क्षीरसागर या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
डॉक्टर हिना गावित यांनी भाषणात पुढे सांगितले की, भाजपा सरकारने आदिवासींना मोफत शिक्षण दिले आहे, रोजगार देत आहे, शेती उत्पन्नावर आधारित प्रक्रिया उद्योग देत आहे तर त्याचा लाभ घेत सर्वांनी प्रगती साधली पाहिजे. आदिवासी दिवस साजरा करताना केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी आपण सामूहिक विकासाला गतिमान करणारे उपक्रम राबवण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. तर डॉक्टर सुप्रिया गावित यांनी शिक्षणाशिवाय प्रगती नाही हे लक्षात घेऊन शिक्षणाला महत्त्व द्यावे, भगवान एकलव्य, भगवान बिरसा मुंडा यांनी केलेल्या कार्याचा आदर्श घेऊन सामूहक विकासासाठी प्रयत्न करावे, असे विचार व्यक्त केले.
माजी सभापती कविता क्षीरसागर यांनी प्रमुख भाषणात स्थानिक युवकांच्या कार्याचे आणि डॉक्टर हिना गावित यांच्या सक्रियतेचे कौतुक केले. खासदार पदावर नसताना सुद्धा जनतेत राहून डॉक्टर हिना गावित अशा विधायक स्वरूपाच्या कार्याला गती देत असल्याने आम्ही ग्रामस्थ सदैव पाठीशी राहू, असे विचार अन्य वक्त्यांनी मांडले.
जिल्हा परिषद सदस्य खंडू कुंवर, माजी सभापती कविता क्षीरसागर, सरपंच बानुबाई सोनवणे, उपसरपंच रमेश शेवाळे, वसंत घरटे, के.टी.सूर्यवंशी, विशाल ठाकरे, नंदकिशोर ठाकरे, हेमंत मालचे, नितेश वळवी, महेंद्र माळी, पवन वाघ, राजू मालचे, पप्पू ठाकूर, स्वप्नील बागूल, मोती कोकणी, चेतन सूर्यवंशी, रमेश ठाकरे, राजेंद्र वाघ आणि स्थानिक युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








