नंदुरबार l प्रतिनिधी-
पथराई ता. जि. नंदुरबार येथील के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात गुरुपूजन उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शरद पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून बि.डी. वळवी व प्रा. ज्ञानेश्वर गवळे उपस्थित होते. सर्वप्रथम माता सरस्वती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्राचीन काळातील गुरुकुल शिक्षण पद्धती, १९४८या काळात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजापर्यंत पोचवलेले शिक्षण आणि आत्ताची आधुनिक शिक्षण पद्धती यावर आधारित छोट्या मात्र अतिशय जिवंत देखावा असलेल्या नाटिका सादर केल्या. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. ज्ञानेश्वर गवळे यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमा विषयीचे सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व स्पष्ट करून महर्षी वेद व्यास यांच्या विषयीची माहिती सांगितली. तर आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य पाटील यांनी विद्यार्थ्यांना गुरुजनांचा , आई-वडिलांचा आदर करा. जीवनात खूप मोठे व्हा व आपल्या गुरूंचेही नाव रोशन करा असे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन हे अरमान पठाण व श्रीमती नीलिमा वाघ यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीमती नीलिमा वाघ यांनी केले. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सांगता वंदे मातरम ने करण्यात आली.








