नंदूरबार l प्रतिनिधी
भालेर ता. नंदुरबार येथील का. वि. प्र. संस्था संचलित श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस तसेच भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्ष सुरेश चौरे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पवार व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील उपस्थित होते. यावेळी प्राचार्य एस. जी. सैंदाणे व पर्यवेक्षक पी. डी. पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक रवींद्र चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मता, देशाची एकता, अखंडता व सुरक्षितता जपण्याची सामूहिक शपथ दिली. सरदार पटेल यांनी देशातील विविध संस्थानांचे एकत्रीकरण करून अखंड भारताच्या निर्मितीत ऐतिहासिक योगदान दिले, तर इंदिरा गांधी यांनी देशाच्या नेतृत्वात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम, एकात्मता व कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा घ्यावी, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
“अनेकतेत एकता, हीच भारताची महानता; एक भारत, श्रेष्ठ भारत, हाच आपला संकल्प!” या घोषवाक्याने कार्यक्रमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. व्ही. ईशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी परिश्रम घेतले.








