खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले
नंदुरबार | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, नंदुरबार येथे वरिष्ठ पर्यवेक्षक जिजाबराव चौधरी (वय ५८) यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी सन २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, नंदुरबार येथून पापड उद्योग व पीठ गिरणीसाठी १० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जावर ३५ टक्के अनुदान मंजूर असल्याने संबंधित प्रस्ताव मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर तक्रारदाराच्या कर्ज खात्यात ३ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान जमा झाले.
हे अनुदान मिळवून दिल्याच्या मोबदल्यात आरोपी जिजाबराव चौधरी यांनी सुरुवातीला १० ते १२ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर पाच हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर गुरुवारी (दि. ३० जून) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील टेकरा तलाव रोड परिसरात सापळा रचण्यात आला. आरोपीने तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने तिला रंगेहाथ पकडले.
पोलीस उपअधीक्षक भारत तांगडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक विकास लोंढे, सहाय्यक पोलिस उप निरीक्षक विलास पाटील, पोलीस हवालदार देवराम गावित आदींच्या पथकाने केली .








