नंदुरबार l प्रतिनिधी-

मोलगी येथील सार्वजनिक रस्त्यावर भरधाव स्पोर्ट्स दुचाकीवर धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या युवकाविरुद्ध अक्कलकुवा पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेत ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ जून २०२६ रोजी एका अज्ञात दुचाकीस्वाराने अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी सार्वजनिक रस्त्यावरील एसटी बसस्थानकाजवळ स्पोर्ट्स मोटारसायकलवर धोकादायक स्टंटबाजी केली होती. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला होता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अक्कलकुवा पोलिसांनी व्हिडिओची पडताळणी करून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२५, २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर व्हिडिओतील वाहनचालकाचा शोध घेण्यात आला असता, तो जितीन गंगसिंग पाडवी (वय २२, रा. भागरीपाडा, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) असल्याचे निष्पन्न झाले.
चौकशीत सार्वजनिक रस्त्यावर स्टंटबाजी केल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधित युवकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशीष कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये व पोलीस निरीक्षक अर्जुन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, सार्वजनिक रस्त्यावर स्टंटबाजी, भरधाव वाहन चालविणे किंवा स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच यापुढेही धोकादायक पद्धतीने वाहन चालविणारे, अवैध प्रवासी वाहतूक करणारे आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहिमेद्वारे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.









