नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत महिला किसान दिनाचे औचित्य साधून महिला किसान दिवस व क्षेत्रीय किसान गप्पा गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास नंदुरबार तालुक्यातील लोय , वाघाळे , सुतारे , काकर्दे , बामडोद, भादवड , वैंदाने , ठानेपाडा , विरचक येथील आत्मा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी गटातील महिला शेतकरी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा नंदुरबार निलेश भागेश्वर तर प्रमुख पाहुणे तथा तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कृषी महाविद्यालय नंदुरबार येथील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. पी. पी. गिरासे , सहाय्यक प्राध्यापक एस. जी. राजपूत उपस्थित होते. सुरुवातीला कार्यक्रमात उपस्थित महिला शेतकऱ्यांना कृषीशाश्र तज्ञ डॉ. पी.पी. राजपूत यांनी रब्बी हंगामातील प्रमुख पिके गहू व हरभरा पिकाचे लागवड व काढणी पश्चात तंत्रज्ञान यावर तर उद्यानविद्या तज्ञ प्रा.एस.जी.राजपूत यांनी कांदा पीक लागवड तंत्रज्ञान , कृषी मालावर प्रक्रिया उद्योग उभारणी यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर महिला किसान दिनानिमित्त धुळे येथून ऑनलाइन पद्धतीने कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाचा महिला शेतकऱ्यांनी लाभ घेतला. त्यानंतर मंडळ कृषी अधिकारी एस.बी. गांगरडे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेविषयी सखोल माहिती देऊन जास्तीत महिला शेतकऱ्यांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घेण्याबाबत आव्हान केले. अध्यक्षीय भाषणात निलेश भागेश्वर यांनी महिला किसान दिनाच्या शुभेच्छा देताना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन महिलांनी सक्षम होऊन शेती क्षेत्रात प्रगती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक उमेश भदाणे यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन व आभार आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक चंद्रकांत बागुल यांनी केले. नंदुरबार तालुक्यातील सर्व महिला कृषि सहाय्यक यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात मदत करून उत्साहाने सहभाग घेतला. तसेच कार्यक्रमासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ , डी एस सी फौंडेशन , चैतन्य फाउंडेशन , आयटीसी ,यांचे मोलाचे सहकार्य लाभले.








