नंदुरबार l प्रतिनिधी-
आगामी गुढीपाडवा, रमजान ईद, श्रीराम नवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सण-उत्सव शांततेत व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून पार पडावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले. ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात दुपारी ३ वाजता पार पडली.
बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त एस. यांनी भूषविले. यावेळी जिल्हाभरातील विविध ठिकाणांहून शांतता समितीचे सुमारे १०० ते १५० सदस्य, तसेच प्रतिष्ठित नागरिक व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत आगामी सण-उत्सवांच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः सणांच्या काळात सामाजिक सलोखा राखणे, अफवांवर विश्वास न ठेवणे, तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आशा गांगुर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन (नंदुरबार), दत्ता पवार (शहादा), सुभाष भोये (अक्कलकुवा), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी सर्वांनी एकत्रितपणे शांतता, सुव्यवस्था व सामाजिक ऐक्य राखण्याचा निर्धार व्यक्त केला.







