नंदुरबार l प्रतिनिधी-
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा तसेच 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा निर्णय शहादा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली.
सांगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी 18 डिसेंबर 2017 रोजी सायंकाळी शेतात जात असताना आरोपी समाधान विक्रम माळी (वय 28, रा. खेडे) याने तिचा गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित मुलीने घरी जाऊन आपबिती सांगितली. त्यानंतर मुलीच्या पालकांनी सांगखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता तसेच बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आणि तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षाने पीडित मुलगी, तिचे पालक, वैद्यकीय अधिकारी तसेच तपास अधिकारी यांच्या साक्षी सादर केल्या. साक्षी व पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी समाधान माळी याला दोषी ठरवित 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. वाय. एम. मोरे यांनी कामकाज पाहिले. तसेच तपास अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. निकालानंतर पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले.








