तळोदा | प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील आमलाड येथील एका हॉटेलात मागे बनावट इंधन ऑईल विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरच तळोदा महसूल प्रशासनाने तेथे छापा टाकला. त्यावेळी ५०० लिटर बनावट इंधन आढळून आले. दरम्यान वीज जोडणी देखील अनधिकृत आढळून आली. याबाबत संशयीत विरोधात प्रशासनाने पोलिसात कारवाई प्रस्तावित केली आहे.
महसूल अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार तळोदा तालुक्यातील आमलाड जवळील खेतेश्वर हॉटेलच्या मागे बनावट इंधन वाहनांना विक्री केली जात असते, अशी माहिती उपविभागीय अधिकारी मैनेक घोष यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी तहसीलदार गिरीष वाखारे, पुरवठा निरीक्षक संदीप परदेशी, फौजदार अमितकुमार बागुल, वीज वितरणाच्या अभियंता विलास गुरव यांच्या पथकाने बुधवारी दुपारी तेथे छापा टाकला. हॉटेलची झाडा, झडती घेतली असता तेथे टाकीमध्ये ५०० लिटर बनवत ऑईल आढळून आले. शिवाय २० लिटरच्या १४ टाक्या, मोटार, ऑईलचे दर दर्शविणारे यंत्र ,पाईप असा मुद्देमाल देखील आढळून आला. विशेष म्हणजे वीज मिटर देखील नव्हते. त्यामुळे जोडणी अनधिकृत घेतलेले होते. त्यामुळे हे साहित्य वीजवितरण कंपनीने जप्त केले. सदर हॉटेलचे चालक बाबुलाल राजपुरोहित रा.बादमर, राजस्थान, रामलाल ठाकरे यांचे असल्याची माहिती महसूल अधिकार्यांनी दिली. शिवाय इंधन विक्री करणारा हरीश खेनीं रा.सुरत हा आहे. संशयीत विरोधात पोलिसात कारवाई करण्याचे प्रस्तावित असल्याचे महसूल सूत्रांनी सांगितले. प्रथमच अवैध बनावट ऑईल विक्री करणार्या रॅकेटवर प्रशासनाने कारवाईच्या बडगा उगारल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.








