नंदुरबार । प्रतिनिधी
“वंदे मातरम्” या गीताला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. “वंदे मातरम्” हे केवळ शब्द नाहीत, ते आपल्या स्वातंत्र्याची आणि स्वातंत्र्योत्तर काळाची खरी प्रेरणा आहे, असे उद्गार जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी काढले आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने नंदुरबार शहरातील जी.टी. पाटील महाविद्यालयात आयोजित वंदे मातरम् गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त सामूहिक “वंदे मातरम्” गीत गायन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत त्या होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षक स्नेहा सराफ, नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, जी.टी.पी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्रसिंह रघुवंशी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य योगेश पाटील, प्रमुख वक्ते गौरीशंकर धुमाळ, विविध शासकीय कार्यालयांचे प्रमुख, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जीटीपी महाविद्यालयाचे अधिव्याख्याता, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. मित्ताली सेठी म्हणाल्या, 1875 साली बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी या काव्याची निर्मिती केली आणि त्या काळात हे गीत स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाचे सामर्थ्य बनले. कारागृहात असतानाही, आंदोलनाच्या प्रत्येक पावलावर, प्रत्येक मोर्चात, जेव्हा स्वाभिमान आणि देशभक्तीची भावना प्रखर व्हायची, तेव्हा स्वातंत्र्यसैनिकांचा आवाज एकच असायचा “वंदे मातरम्!” हे गीत केवळ शब्द नव्हते, स्वातंत्र्यवीरांचे धैर्य होते. वंदे मातरम् शिकवते की, देश म्हणजे फक्त नकाशा नाही, तर मातेसमान भूमी आहे आणि आपण तिची लेकरं. आज आपण स्वतंत्र आहोत, पण वंदे मातरम् आपल्याला अजूनही आठवण करून देते की देशासाठी कार्य करणे, स्वच्छतेत योगदान देणे, शेतकऱ्याचा मान राखणे, सर्वांचा सन्मान करणे आणि समाजाच्या विकासात हातभार लावणे हेच खरे आजच्या दिवशीचे वंदन आहे. 150 वर्षांचा हा प्रवास आपल्याला शिकवतो की देशभक्ती म्हणजे केवळ घोषणा नाही, तर कर्तव्य पार पाडणे आहे. चला, या मातृभूमीला प्रणाम करताना आपल्या आवाजात वंदे मातरम् चा अभिमान सदैव जागृत ठेवू.
यावेळी बोलताना प्रमुख वक्ते गौरीशंकर धुमाळ यांनी वंदे मातरम् या गीताचा इतिहास आणि महती सांगताना सांगितले की, वंदे मातरम् हे गीत 1875-76 च्या दरम्यान बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आनंदमठ या कादंबरीत लिहिले, आणि पुढे 1882 मध्ये प्रकाशित झाल्यानंतर हे गीत राष्ट्रभावनेचे प्रतीक बनले. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात आंदोलन, सत्याग्रह आणि जनजागृतीत “वंदे मातरम्”चा जयघोष हा शौर्य, एकता आणि देशप्रेमाचा उर्जास्रोत ठरला. 1905 च्या बंगाल फाळणीविरोधातील आंदोलनात हे घोषवाक्य संघर्षाचा नारा बनला आणि लोकांना निर्भयपणे लढण्याची प्रेरणा मिळाली. 1950 मध्ये संविधानसभेने वंदे मातरम्ला राष्ट्रगीताचा दर्जा दिला. मातृभूमीला “माते”च्या रूपात पाहणारी त्यातील उपासना भारतीय संस्कृतीतील निसर्ग, माती आणि मातृत्व या मूल्यांची प्रतीकात्मक अभिव्यक्ती आहे. स्वातंत्र्याच्या पलीकडे जाऊन आजही हे गीत देशभक्ती, बलिदान आणि राष्ट्रीय अभिमानाची प्रेरणा जागृत करते.
यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी एक प्रबोधनपर नाटिका सादर केली.







