नंदुरबार l प्रतिनिधी-
येथील प्रखर हिंदु अभिमानी कार्यकर्ते तथा प्रसिद्ध उद्योजक नितेश अग्रवाल यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
नितेश अग्रवाल हे उद्योजक म्हणून बहुपरिचित आहेत त्याचप्रमाणे समाजसेवी म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून कार्यरत राहताना नितेश अग्रवाल यांनी उत्तम संघटन देखील केले आहे. वाजंत्री च्या गजरात वाजत गाजत आणि फटाक्यांची आतषबाजी करीत हे शेकडो कार्यकर्ते डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी आले तेव्हा मोठी वातावरण निर्मिती झाल्याचे पाहायला मिळाले. नंदुरबार शहरातील इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश घेणे, ही घटना आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी लक्षवेधी मानली जात आहे.
माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित तसेच संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते स्कार्फ देऊन सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश देण्यात आला. समवेत माजी नगरसेवक अविनाश माळी, आकाश चौधरी, नरेंद्र माळी, भाजपाचे जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी, आकाश चव्हाण, आतिश मराठे, अक्षय माळी, दिनेश माळी, गोटू अग्रवाल, लालू पाटील, आशिष कडोसे, पंकज कडोसे, पंकज गोंधळी, सर्वेश शर्मा, आनंद साळवे, प्रथम व्यास, किर्तन अग्रवाल भावेश मराठे, निर्मल मराठे आदी उपस्थित होते.
नितेश अग्रवाल यांनी याप्रसंगी सांगितले की, डॉक्टर विजयकुमार गावित यांनी जिल्हा निर्मितीपासून आतापर्यंत मोठे विकासात्मक कार्य केले असून या आदर्श नेतृत्वाच्या मार्गदर्शनात पुढील वाटचाल करणार आहे. डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करुन मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रत्येक घटकाला सामावून घेणे आणि प्रत्येक घटकाचा विकास करणे हेच आपले ध्येय आहे. पक्षाने दिलेले उपक्रम एक दिलाने राबवून आपणा सर्वांना याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा विस्तार करण्याबरोबरच शहर आणि जिल्हा विकासाचे ध्येय आपल्याला एकत्रितपणे गाठायचे आहे; असेही ते म्हणाले.