नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘मूळवाट’ हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) अंतर्गत पुढील सहा महिन्यांसाठी सर्व ग्रामपंचायतींमध्ये कामाचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक गावात रोजगार उपलब्ध आहे आणि कोणत्याही कुटुंबाला कामाच्या शोधात स्थलांतर करण्याची गरज भासणार नसून सर्व गरजू कुटुंबांनी या योजनेच्या माध्यानतून स्वावलंबनाकडे वाटचाल करावी, असे आवाहन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.
ते जिल्हाधिकारी कार्यालयात स्थलांतर नियंत्रणासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुळवाट’ कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडून सर्व नागरिकांना आणि स्थलांतरित मजूर बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की, रोजगाराच्या उपलब्धतेच्या अभावामुळे कोणीही गाव सोडून स्थलांतर करू नये. असा प्रशासनाचा स्पष्ट हेतू आहे. तथापि, जर स्थलांतर अपरिहार्य ठरलेच, तर नागरिकांनी आपल्या ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी कार्यालयात मुकादमाचे नाव आणि गंतव्य जिल्ह्याचे नाव नोंदवावे, जेणेकरून प्रशासनाला आवश्यक मदत आणि संरक्षण वेळेवर पुरवता येईल. स्थलांतरित कुटुंबांना त्यांच्या आरोग्य, पोषण, रोजगार आणि शासकीय सेवांच्या बाबतीत कोणतीही अडचण आल्यास तात्काळ मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे.
ही हेल्पलाइन सेवा जिल्हा प्रशासनाच्या ‘जनसेतु’ या सर्वसमावेशक एकत्रित हेल्पलाइन प्रकल्पाचा एक भाग असून, या प्रकल्पाचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले आहे. ‘जनसेतु’ प्रकल्पाचा उद्देश नागरिकांना शासनाच्या विविध सेवांसाठी एकाच माध्यमातून सुलभ संपर्क आणि त्वरित मदत उपलब्ध करून देणे हा आहे. ‘मूळवाट’ उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेली ही हेल्पलाइन सेवा ‘जनसाहस’ या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.
नागरिकांनी स्थलांतरित झाल्यास अथवा स्थलांतराचा विचार करत असल्यास त्वरित मजदूर हेल्पलाइन क्रमांक 1800 120 11211 आणि महिला व बालकांसाठी हेल्पलाइन क्रमांक 1800 3000 2852 या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच प्रशासनाकडून माहिती देण्यासाठी किंवा नोंदणीसंदर्भात संपर्क साधण्यासाठी आउटगोइंग कॉल्स क्रमांक 02564-299544 आणि 02564-299644 वरून करण्यात येतील. नागरिकांनी या क्रमांकांवरून येणाऱ्या कॉल्सना प्रतिसाद द्यावा, अशी विनंती आहे.
या उपक्रमाद्वारे जिल्हा प्रशासनाचे उद्दिष्ट आहे की प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आपल्या गावातच रोजगार मिळावा, स्थलांतरित मजुरांचे आरोग्य, पोषण आणि सुरक्षा सुनिश्चित व्हावी, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय सर्वांपर्यंत पोहोचावा. नंदुरबार जिल्हा प्रशासन सर्व नागरिकांना आवाहन करतो की, जर स्थलांतर अटळ असेल, तर कृपया नोंदणी करून प्रशासनाला सहकार्य करा आणि आपल्या गावात रोजगार निर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी व्हा.
*मुळवाट च्या माध्यमातून मातीशी नाळ कायम राहील: डॉ. मित्ताली सेठी*
‘मूळवाट’ हा केवळ रोजगार उपक्रम नसून, आपल्या मातीशी नाळ कायम ठेवणारा आणि स्वावलंबनाचा आत्मविश्वास वाढविणारा प्रयत्न आहे. आपल्या सहभागातून आपण केवळ आपल्या कुटुंबाचे नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याच्या प्रगतीचे योगदान देत आहात. प्रशासन आणि नागरिक मिळून नंदुरबारला स्थलांतरमुक्त, रोजगारसंपन्न आणि आत्मनिर्भर जिल्हा बनवू हीच आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.” असे यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सांगितले.