नंदुरबार l प्रतिनिधी-
संतप्त शेतकऱ्यांच्या जन आक्रोश आंदोलना प्रसंगी माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी स्वतः उपस्थित राहून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत सुमारे 6 हजार 800 मेट्रिक टन युरिया नेमका कोणाला विकला आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळाला याचा हिशोबच नसल्याचे उघड केले. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या अधिकाऱ्यांनी कृषी सेवा केंद्रांमधून युरिया उपलब्ध करून देत वाटप सुरू केल्याचे पाहायला मिळाले. जनअक्रोश आंदोलनाला मिळालेले हे यश असल्याचे सांगत अनेक शेतकऱ्यांनी धन्यवाद दिले.
बफर योजनेअंतर्गत भरमसाठ युरिया उपलब्ध असताना देखील अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांना चढ्या दराने युरिया खरेदी करायला भाग पाडले व शेतकऱ्यांची लूट केली यावरून संतप्त झालेल्या शेतकरी ग्रामस्थांनी अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर आक्रोश करीत दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी तब्बल सात तास धरणे आंदोलन केले. त्यामुळे अक्कलकुवा तहसील कार्यालय ठप्प पडले होते. याप्रसंगी माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी स्वतः उपस्थित राहून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली त्यावेळी सुमारे 6 हजार 800 मेट्रिक टन युरिया नेमका कोणाला विकला आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळाला याचा हिशोबच नसल्याचे उघड झाले. आंदोलनाच्या ठिकाणी डॉक्टर हिना गावित यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना फैलावर घेत सगळे रेकॉर्ड दाखवायला भाग पाडले. त्यामुळे हजारो मेट्रिक टन युरिया काळा बाजारात गायब होत असताना देखील संबंधित सर्व अधिकारी कसे निष्क्रिय राहिले हे सर्वांसमोर उघड झाले. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून डॉक्टर हिनाताई गावित यांनी दखल घ्यायला भाग पाडले.
या जन आक्रोश आंदोलनात बोलताना माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी युरिया खताच्या भ्रष्टाचाराला जबाबदार असलेल्यांवर घणाघात केला. उपस्थित ग्रामस्थांसमोर त्यांनी सांगितले की, मागील वर्षी खासदार असताना मोदी सरकारकडून नंदुरबार जिल्ह्यासाठी स्वतंत्र रॅक मंजूर करून घेतला होता. बफर योजनेतून हजारो टन युरिया प्राप्त झाला होता. त्यातूनच अक्कलकुवा तालुक्यात मोठ्या प्रमाणात युरिया खताच्या पुरवठा झाला असताना देखील शेतकरी युरिया खतापासून वंचित ठेवले गेले.
तालुक्यातील काही कृषी सेवा केंद्रांनी मोठ्या प्रमाणावर काळाबाजार केला असून, त्याला स्थानिक लोकप्रतिनिधींचे पाठबळ मिळाल्याचे दिसत आहे, यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व दोषी कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे; असेही डॉक्टर हिना गावित म्हणाल्या. दरम्यान, सर्वाधिक तक्रारी असणाऱ्या श्रीराम ऍग्रो एजन्सी, दीपभूषण फार्मर प्रोडूसर कंपनी, गणेश एजन्सीसह इतर खते विक्री केंद्रांची चौकशी करून, 11 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंत कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा कृषी अधीक्षक चेतनकुमार ठाकरे यांच्या आदेशान्वये तालुका कृषी अधिकारी सुरज नामदास, व कृषी अधिकारी किशोर हडपे, कृषी निरीक्षक वसावे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर, आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले. दरम्यान दिनांक 11 सप्टेंबर रोजी अक्कलकुवा तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांमधून युरिया खताचे वाटप सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. अधिकाऱ्यांनी हे वाटप आधी का केले नाही हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
जनआक्रोश मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार डॉक्टर हिना गावित, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी केले, यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, प्रताप वसावे, नटवर पाडवी, नितेश वळवी, अक्कलकुवा मंडळ अध्यक्ष भूषण पाडवी, मोलगी मंडळ अध्यक्ष तथा सरपंच आकाश वसावे, भूपेंद्र पाडवी, किसन नाईक, जयमल पाडवी, माजी पंचायत समिती सदस्य धनसिंग वसावे, सुधीर पाडवी, किशोर वळवी, अशोक राऊत, अनिल पाडवी, जगदीश वसावे, किसन नाईक, बहादुरसिंग पाडवी, हरिदास गोसावी, रोशन पाडवी, नरेश पाडवी, दिलीप वसावे, मनोज सोनार, नरेश पाडवी, मनीषा राऊत, ईश्वर वसावे आदि उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, किरसिंग वसावे, प्रताप वसावे, नटवर पाडवी, धनसिंग वसावे, नितेश वळवी, आकाश वसावे, सुधीर पाडवी आदींनी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि अधिकाऱ्यांची मनमानी भाषणातून मांडली.








