बाल क्रांतीकारांना शहीद दिनानिमित्त केले अभिवादन
नंदुरबार l प्रतिनिधी-
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊन आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या बाल शहिदांच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करीत माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी भावपूर्ण मानवंदना दिली.
दरवर्षी 9 सप्टेंबरला हुतात्मा दिवस साजरा केला जातो. त्यानुसार दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी शहीद स्मृती समिती आणि जिल्हा पोलीस दल यांच्यावतीने शहरातील व जिल्ह्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत सामूहिकपणे ही मानवंदना देण्यात आली. शहीद स्मृति समितीचे अध्यक्ष एडवोकेट रमाबाई शहा, निंबाजीराव बागुल, कीर्ती भाई सोलंकी, प्राध्यापक राजेंद्र शिंदे, अभिजीत सरोदे, संदीप चौधरी यांच्यासह राजकीय सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
महात्मा गांधींनी इंग्रजांना “चले जाव’चा इशारा दिल्यानंतर ९ सप्टेंबर १९४२ ला नंदुरबारमध्ये निघालेल्या प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभातफेरी नेतृत्व शिरीष कुमार मेहता, शशिधर केतकर, लालदास शाह, धनसुखलाल वाणी आणि घनश्यामदास शाह यांनी केले. मध्यवर्ती ठिकाणी ती फेरी पोलिसांनी अडवली. पोलिसांनी ही मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले. या बालकांनी ते आवाहन झुगारले आणि “भारत माता की जय’, “वंदे मातरम्’चा जयघोष सुरूच ठेवला. अखेर पोलिसांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबारात हे पाच बाल क्रांतिकारक हुतात्मा झाले होते. त्यांच्या बलिदानाला ८३ वर्षे पूर्ण होत आहे.








