नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील वाघाळे येथे युवकास मारहाण करुन मृत्यूस कारणीभूत ठरणा-या आरोपीस सत्र न्यायालयाने 5 वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील वाघाळे येथे राहणारे फिर्यादी डोंगरसिंग चौरे यांचा मुलगा रविंद्र डोंगरसिंग चौरे, वय- 32 याचे त्याच्याच गावातील सदर गुन्हयातील आरोपी दला ऊर्फ गणेश जाधव याचे पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचे कारणावरुन आरोपी दला ऊर्फ गणेश जाधव याने फिर्यादी यांचा मुलगा रविंद्र चौरे यास त्याचे घरात घुसून जिवे ठार मारण्याचे उद्देशाने वार केले होते, म्हणून नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे दि. 16/07/2022 रोजी भा.द.वि. कलम 307,324,323,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक योगेश चौधरी यांनी सदर गुन्हयाचा तपास पो. उपनिरीक्षक सुरेश सोनवणे यांचेकडेस सोपविला. श्री. सोनवणे यांनी आरोपीस ताब्यात घेऊन अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीविरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र मा. न्यायालयात सादर केले होते.
त्याअन्वये आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने आरोपी गणेश ऊर्फ दला ब्रिजलाल जाधव वर्षे, रा. वाघाळे ता.जि. नंदुरबार यास मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार श्री.एस.बी. कचरे यांनी भा.द.वि. 307, 324, 323, 506 गुन्हयात कलम 304 (पार्ट II) अन्वये दोषी ठरवत 05 वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सदर खटल्याची सुनावणी मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार एस. बी. कचरे यांचे समक्ष झाली असून सरकारी पक्षाचे वतीने अति. सरकारी अभियोक्ता अॅड. व्ही.सी. चव्हाण यांनी काम पाहीले आहे. सदर खटल्यामध्ये साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, पंच व इतर साक्षीदार यांची साक्ष महत्वाची ठरली आहे. खटल्याचे सुनावणी दरम्यान पोसई सागर नांद्रे, पैरवी अधिकारी तसेच पैरवी अंमलदार पोहेकों/नितीन साबळे, पोहेकॉ पंकज बिरारे, पोहेकॉ शैलेंद्र जाधव यांनी कामकाज पाहीले आहे.
सदर गुन्हयातील तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच अति. सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार संजय महाजन यांनी अभिनंदन केले आहे.