नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कवयित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि गजमल तुळशिराम पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 21 फेब्रुवारी 2025 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्यासह, कवयित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु विजय माहेश्वरी, नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन चंद्रकांत रघुवंशी, उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, गजमल तुळशिराम पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त विजय रिसे आणि कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी शंकर जाधव उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी वर्ग आणि इतर मान्यवरांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला.
मेळाव्यात नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव आणि गुजरात येथील 38 नामांकित उद्योजकांनी सहभाग घेतला. एकूण 1 हजार 123 विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घेत विविध कंपन्यांकडे मुलाखती दिल्या. यामधून 32 उमेदवारांची त्वरित निवड करण्यात आली, तर 526 उमेदवारांना पुढील टप्प्याची मुलाखत देण्यासाठी बोलविण्यात आले आहे.
या कार्यक्रमात सरकारी महामंडळांनी आपल्या योजनांची माहिती देऊन उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कर्मचारी, गजमल तुळशिराम पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी, तसेच ट्रायबल सेंटरमधील समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
नंदुरबार जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या या उपक्रमाने तरुण पिढीला रोजगाराच्या दृष्टीने नवी दिशा दिली असून, भविष्यातही अशा प्रयत्नांनी स्थानिक युवकांना अधिकाधिक संधी मिळण्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.